अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त ः क्षणार्धात करू शकतो शत्रूचा नाश
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारत आता शस्त्रास्त्रांप्रकरणी अन्य देशांवरील निर्भरता कमी करत आहे. शस्त्रास्त्रांप्रकरणी भारत सर्वाधिक रशिया आणि अमेरिकेवर निर्भर आहे, परंतु स्वदेशी शस्त्रास्त्रांवर आता जलदगतीने काम केले जात आहे. रशियन बनावटीचे एमआय-17 या हेलिकॉप्टरला बदलण्यासाठी भारताकडे पुढील 8-10 वर्षांमध्ये एक स्वदेशी मध्यम लिफ्ट हेलिकॉप्टर असणार असे एचएएलच्या एका अधिकाऱयाने सांगितले आहे.
भविष्यासाठी 13 टनाच्या भारतीय मल्टीरोल हेलिकॉप्टरचे (आयएमआरएच) प्रारंभिक डिझाइन प्रथम सुरू केले जाईल. मंत्रिमंडळाच्या सुरक्षा विषयक समितीकडून मंजुरी मिळाल्याच्या 4 वर्षांमध्ये आम्ही प्रोटोटाइपच्या पहिल्या उड्डाणासाठी सज्ज असू तर पुढील 4 वर्षांमध्ये परीक्षण प्रमाणपत्र प्राप्त करू असे उद्गार एचएएलचे मुख्य व्यवस्थापक (डिझाइन) अब्दुल रशीद ताजर यांनी काढले आहेत. हे हेलिकॉप्टर भारतीय वायुदलात 8 वर्षांनी सामील होण्यासाठी तयार असेल. तसेच ते रशियन बनावटीच्या एमआय-17 ची जागा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
250 एमआय-17 भारताच्या ताफ्यात
देशाचे स्वदेशी मीडियम लिफ्ट हेलिकॉप्टर भारतीय वायुदलाच्या परिवहन हेलिकॉप्टर ताफ्यातील मोठे अंतर भरुन काढणार आहे. वायुदलाकडे सध्या 250 एमआय-17 हेलिकॉप्टर्स आहेत. प्रत्येक हेलिकॉप्टर 30 हून अधिक सैनिक आणि अनेक शस्त्रास्त्रांचा भार पेलू शकते. आयएमआरएच हे हवाई हल्ले, हवाईवाहतूक, लढाऊ रसद, बचावकार्यांना समर्थन करण्यास सक्षम असणार आहे. हे हेलिकॉप्टर 4,500 किलोग्रॅमपर्यंतचा पेलोड वाहून नेण्यास सक्षम असेल.
फ्रान्सकडून सहकार्य
हेलिकॉप्टरचे इंजिन फ्रान्सच्या सफरान हेलिकॉप्टर अणि एचएएलकडून संयुक्त स्वरुपात विकसित केले जाणार आहे. एअरो इंडियादरम्यान दोन्ही कंपन्यांनी हेलिकॉप्टरच्या इंजिनचे डिझाइन, विकास, निर्मितीसाठी संयुक्त उपक्रम स्थापन करण्यासंबंधी करारावर स्वाक्षरी केली आहे. एका हेलिकॉप्टरची किंमत 300 कोटी रुपयांहून अधिक राहण्याची शक्यता आहे. एलएएल 500 हून अधिक हेलिकॉप्टर्सच्या ऑर्डरची शक्यता विचारात घेत काम करत आहे.
मित्रदेशांना निर्यातही होणार
एचएएल भारताच्या मित्रदेशांना हे हेलिकॉप्टर पुरविण्याचा प्रस्ताव देणार आहे. आयएमआरएचमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि उपकरणांचा अंतर्भाव असणार आहे. या श्रेणीतील हेलिकॉप्टर्सचा शोध घेणाऱया देशांना निर्यात करण्यासाठी हा एक चांगला पर्याय ठरणार आहे.