वृत्तसंस्था /वॉशिंग्टन
अमेरिकेचे माजी उपाध्यक्ष माइक पेन्स यांनी अध्यक्षीय निवडणुकीसाठी रिपब्लिकन पार्टीची उमेदवारी मिळविण्याकरता स्वत:च्या प्रचारमोहिमेला सुरुवात केली आहे. पृथ्वीवरील सर्वात महान राष्ट्राला अच्छे दिन आणणार, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. वेगवेगळा काळ वेगवेगळ्या नेतृत्वाची मागणी करत असतो. सहकार्य अन् परोपकाराच्या दिशेने नेणाऱ्या नेत्याची आता आमच्या पक्षाला गरज आहे. ईश्वर अन् स्वत:च्या कुटुंबाला साक्ष मानून अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत उमेदवारीच्या शर्यतीत सामील होण्याची घोषणा करत असल्याचे माइक पेन्स यांनी म्हटले आहे. तर माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रिपब्लिकन पार्टीचा उमेदवार होण्याच्या शर्यतीत सामील असल्याचे पूर्वीच जाहीर केले आहे. रिपब्लिकन पार्टीत अध्यक्षीय पदाची उमेदवारी मिळविण्यासाठी पहिल्यांदाच माजी अध्यक्षांना स्वत:च्या कार्यकाळात उपाध्यक्ष राहिलेल्या नेत्याच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. याचबरोबर फ्लोरिडाचे गव्हर्नर रोन डेसेंटीस, निक्की हेली, दक्षिण कॅरोलिनाचे सिनेटर टिम स्कॉट, न्यूजर्सीचे माजी गव्हर्नर क्रिस क्रिस्टी आणि आरकंससचे माजी गव्हर्नर एसा हचिंसन देखील रिपब्लिकन पार्टीची उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत.