दोन्ही देशांच्या रेल्वेमंत्र्यांकडून सेवेचा शुभारंभ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बांगलादेशच्या पर्यटकांना भारतात आकर्षित करण्यासाठी बुधवारी एक मोठा पुढाकार घेण्यात आला आहे. या पुढाकाराच्या अंतर्गत न्यू जलपाईगुडीपासून ढाका शहरासाठी नवी रेल्वेसेवा सुरू झाली आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील ही तिसरी रेल्वे ठरली आहे. या रेल्वेचे नाव ‘मिताली एक्स्प्रेस’ ठेवण्यात आले आहे. अलिकडेच सुरू करण्यात आलेल्या हल्दीबाडी-चिलाहटी रेल्वेमार्गावरून ही मिताली एक्स्प्रेस धावणार आहे.
भारताचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि बांगलादेशचे रेल्वेमंत्री मोहम्मद नुरुल सुजान यांनी हिरवा झेंडा दाखवून मिताली एक्स्प्रेसला रवाना केले आहे. दोन्ही मंत्र्यांनी दिल्लीच्या रेल भवनातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या रेल्वेसेवेचा शुभारंभ केला आहे.
ही रेल्वे दार्जिलिंग आणि परिसरातील सुंदर खोऱयांमधून जाणार आहे. पर्यटनाच्या दृष्टीकोनातून ही रेल्वेसेवा अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मानले जातेय. बांगलादेशातून मोठय़ा संख्येत लोक या भागात पर्यटनासाठी येत राहिले आहेत. याचमुळे ही रेल्वेसेवा सुरू करण्यात आली आहे. आठवडय़ातील दोन दिवस ही रेल्वे धावणार आहे.
न्यू जलपाईगुडी येथून ही रेल्वे दर रविवारी आणि बुधवारी सकाळी 11.45 वाजता रवाना होईल. त्याच दिवशी रात्री 10.30 वाजता रेल्वे ढाका शहरात पोहोचणार आहे. तर ढाक्यामधून ही रेल्वे दर सोमवारी आणि गुरुवारी रात्री 9.30 वाजता रवाना होईल आणि दुसऱया दिवशी सकाळी 7.15 वाजता न्यू जलपाईगुडी येथे पोहोचणार आहे. न्यू जलपाईगडी ते ढाका कँटमधील अंतर 595 किलोमीटर इतके आहे. हा प्रवास पूर्ण करण्यास रेल्वेला 9 तास 45 मिनिटे लागणार आहेत. यातील केवळ सव्वा तासांचा प्रवास भारतीय भागातील असणार आहे.
नागरिकांमधील संपर्क वाढणार
या रेल्वेमुळे बांगलादेश आणि ईशान्य भारतामधील संपर्क वाढणार आहे. मिताली एक्स्प्रेसमुळे या भागातील पर्यटनाला मोठा लाभ होणार आहे. मागील वर्षी 27 मार्च रोजी दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी मिताली एक्स्प्रेसच्या सेवेचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शुभारंभ केला होता. परंतु कोरोना संकटामुळे ही सेवा सुरू झाली नव्हती.
दोन्ही देशांमधील रेल्वेसेवा
यापूर्वी देखील दोन्ही देशांदरम्यान आणखीन दोन रेल्वेगाडय़ा धावत आहेत. कोलकाता आणि ढाका या शहरांदरम्यान मैत्री एक्स्प्रेस, तर कोलकात आणि खुलनादरम्यान बंधन एक्स्प्रेस दोन्ही देशांच्या हजारो लोकांना प्रवासाचे साधन उपलब्ध करत आहे.