ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी (1 ऑगस्ट) पुणे दौऱ्यावर येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर पुण्यात जय्यत तयारी सुरू आहे. त्यावरून हिंदू महासंघाने अजब प्रतिक्रिया दिली आहे. मोदींनी दर मंगळवारी पुण्यात यावे, त्यामुळे अर्ध्या दिवसापर्यंत का होईना अच्छे दिन आल्याचा भास होईल, असा टोला हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी लगावला आहे.
मोदींना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार स्विकारण्यासाठी मोदी उद्या पुण्यात येत आहेत. शिवाजीनगर येथे मेट्रो ट्रेनच्या विस्तारित मार्गालाही मोदी हिरवा झेंडा दाखवणार आहेत. त्याच ठिकाणी पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पीएमआरडीए या अंतर्गत विकास प्रकल्पांचे लोकार्पण मोदींच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे पुण्यातील रस्त्यावरचे खड्डे बुजवण्याचे काम वेगाने सुरु आहे. रस्त्यावरील खड्डे फक्त बुजवलेच जात नाहीत तर अक्षरशः रस्तेही धुतले जात आहेत. ट्रफिक पोलीस कोपऱ्यात नाही तर चक्क रस्त्यावर दिसत आहेत. वाहने कितीही असो ट्रॅफिक जाम होत नाही. म्हणून मोदींनी दर मंगळवारी पुण्यात यावे. अर्ध्या दिवसापर्यंत का होईना अच्छे दिन आल्याचा भास होतो, असे दवे यांनी म्हटले आहे.