सुकेश चंद्रशेखरचा पत्राद्वारे केजरीवालांवर आरोप
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी तुरुंगात कैद सुकेश चंद्रशेखरने मंगळवारी पुन्हा आम आदमी पक्षाचे संयोजक अन् दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांच्या विरोधात उपराज्यपालांना पत्र लिहिले आहे. उपराज्यपालांसमोर उपस्थित केलेले मुद्दे खोटे निघाल्यास फासावर जाण्याची माझी तयारी आहे, परंतु आरोप सिद्ध झाल्यास अरविंद केजरीवाल स्वतःच्या पदाचा राजीनामा देणार का किंवा राजकारणातून संन्यास घेणार का असे प्रश्नार्थक विधान सुकेशने पत्राद्वारे केले आहे. गोवा तसेच पंजाब निवडणुकीने आम आदमी पक्षाने माझ्याकडून रक्कम मागितली होती आणि मी ती दिली होती असा दावाही त्याने पत्रात केला आहे.
तुरुंगात मला सातत्याने धमक्या मिळत आहे. मी खरं बोलत असल्याने कुणालाच घाबरत नाही. दिल्ली सरकारमधील मंत्री सत्येंद्र जैन यांनी पंजाब निवडणुकीकरता माझ्याकडून पैसे मागितले होते. हा प्रकार मग वाढतच गेल्याने कायद्यानुसार पाऊल उचलण्याचा निर्णय मी घेतला. केजरीवालांनी ड्रामा बंद करावा. ते केवळ मुद्दय़ावरून लक्ष विचलित करू पाहत असल्याचा आरोप सुकेशने केला आहे.
पत्रात सुकेशने उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या वक्तव्याचाही उल्लेख केला आहे. कुणीतरी मदत करत असल्यानेच मी हे करतोय असे सिसोदिया यांनी म्हटले होते. परंतु मला मदतीची गरज नाही, कारण स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यास मी सक्षम आहे असे सुकेशने नमूद पेले आहे.
सुकेशने यापूर्वीही उपराज्यपालांना तीन पत्रे लिहिली आहेत. या पत्रांद्वारे त्याने आम आदमी पक्षावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. जर मी ठक असेन तर केजरीवाल हे महाठक आहेत. केजरीवालांनी राज्यसभा सदस्यत्व मिळवून देण्यासाठी माझ्याकडून 50 कोटी रुपये घेतल्याचा आरोप सुकेशने केला आहे.