पुणे / प्रतिनिधी :
सक्रिय नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी रविवारी महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश व्यापत राजधानी दिल्लीत प्रवेश केला. मान्सूनने देशाचा नव्वद टक्के भाग व्यापला असून, पुढील दोन दिवसांत तो देश व्यापण्याची चिन्हे आहेत. वेरावल, वल्लभ विद्यानगर, उदयपूर, नारनौल, अंबाला, कटरा अशी मान्सूनची रेषा आहे.
बंगालच्या उपसागरात ओरिसा व पश्चिम बंगालच्या किनारपट्टीलगत रविवारी कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती झाली आहे. हे क्षेत्र पुढे उत्तर-उत्तरपश्चिमेच्या दिशेने ओरिसा व झारखंडच्या बाजून जाणार आहे. याबरोबरच उत्तरपूर्व अरबी समुद्रात हवेची द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे मान्सूनच्या पूर्व व पश्चिम या दोन्ही शाखा सक्रिय झाल्या असून, केवळ एका दिवसांत देशाचा बहुतांश भाग मान्सूनने व्यापला आहे.
यात नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी रविवारी पुणे, मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली, गुजरात-राजस्थान व हरियाणाचा काही भाग, हिमाचल प्रदेशचा बहुतांश भाग, जम्मू काश्मीर लद्दाखचा काही भाग व्यापला आहे.
दोन दिवसांत देश व्यापणार?
सर्वसाधारणपणे 8 जुलैच्या आसपास मान्सून देश व्यापतो. दरम्यान, मान्सूनची पश्चिम शाखा ही पूर्व शाखेच्या तुलनेत संथ होती. मात्र, कमी दाबाचे क्षेत्र व अरबी समुद्रातील क्षेत्रामुळे आता दोन्ही शाखांची घोडदौड सुरु झाली असून, 25 जूनपर्यंत देशाचा 90 टक्क्यांहून अधिक भाग मान्सूनने व्यापला आहे. मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण असून, येत्या दोन दिवसांत तो देश व्यापण्याची चिन्हे आहेत.
पोषक स्थिती
येत्या दोन दिवसांत मान्सून गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाणाचा आणखी काही भाग, व जम्मू काश्मीरचा उर्वरित भाग व्यापणार आहे. त्यामुळे यंदा वेळेआधीच मान्सून देश व्यापण्याची शक्यता आहे.
सर्वदूर पाऊस
मान्सूनच्या सक्रियतेमुळे देशभर पावसाने हजेरी लावली आहे. उन्हाच्या काहिलीपासून मुक्ती मिळाली असून, गेल्या दोन दिवसांत अनेक भागांत मुसळधार पाऊस झाला. काश्मीर ते कन्याकुमारी गुजरात ते आसामपर्यंत पावसाने अनेक भागाला झोडपले आहे.
मध्य भारतात ऑरेंज अलर्ट
सध्या बंगालच्या उपसागरात ओरिसा किनारपट्टीजवळ कमी दाबाचे क्षेत्र आहे. हे क्षेत्र मध्य भारताकडे सरकरणार आहे. याशिवाय गुजरात किनारपट्टीलगत हवेची द्रोणीय स्थिती आहे. यामुळे मान्सून सक्रिय असून, पुढील दोन दिवसांत मध्य भारत ते पश्चिम किनारपट्टीवरील अनेक राज्यांत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यात कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, केरळ, ओरिसाला मुसळधार पावसाचा अलर्ट आहे. याशिवाय अनेक राज्याला यलो अलटै देण्यात आला आहे.
कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात ऑरेंज अलर्ट
राज्यात शनिवारपासूनच सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. याबरोबरच पुढील चार दिवस काही जिल्हय़ांना ऑरेंज तसेच यलो अलर्ट देण्यात आला आहे. यात
ऑरेंज अलर्ट सोमवारी (मुसळधार पाऊस )
रायगड, रत्नागिरी, पुणे,नागपूर, बुलढाणा, गोंदिया
यलो अलर्ट सोमवारी (विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस)
पालघर, ठाणे, नाशिक, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, नांदेड, हिंगोली, परभणी, चंद्रपूर, गडचिरोली,
ऑरेंज अलर्ट मंगळवारी
पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, मुंबई, अमरावती, नागपूर
यलो अलर्ट मंगळवारी
सिंधुदुर्ग, सातारा, नाशिक, नंदुरबार, बुलढाणा, चंद्रपूर
ऑरेंज अलर्ट बुधवारी
मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, पुणे, नाशिक
यलो अलर्ट बुधवारी
सातारा, रत्नागिरी, अमरावती, वर्धा, नागपूर