अन्य 13 कंपन्याही उत्सुक ः खरेदीची स्पर्धा रंगण्याची चिन्हे
मुंबई
आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, गौतम अदानी आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी कर्जबाजारी फ्यूचर रिटेल लि.चे अधिग्रहण करण्याच्या शर्यतीत आहेत. रॉयटर्सने याबद्दल एक अहवाल प्रकाशित केला आहे. त्या अहवालानुसार अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज आणि फ्लेमिंगो ग्रुपचा संयुक्त उपक्रम मून रिटेल प्रायव्हेट लिमिटेड, रिलायन्स रिटेल व्हेंचर्स आणि अन्य 13 कंपन्यांनी फ्युचर रिटेलसाठी उत्सुकता दाखवली असल्याचे समजते.
इतर कंपन्यांमध्ये शालिमार कॉर्पोरेशन लिमिटेड, नलवा स्टील अँड पॉवर, युनायटेड बायोटेक, डब्ल्यूएचएसमिथ ट्रव्हल, कॅप्री ग्लोबल होल्डिंग्ज यांचा समावेश आहे. दिवाळखोरीच्या अंतर्गत एकूण 33 सावकारांनी ऑगस्टमध्ये 21,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्जाचे दावे सादर केले. प्रमुख कर्जदारांमध्ये बँक ऑफ इंडिया आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचा समावेश आहे.
देशातील दुसऱया क्रमांकाची सर्वात मोठी रिटेलर होती
फ्युचर ग्रुपच्या फ्लॅगशिप रिटेल युनिट फ्यूचर रिटेलसाठी अर्ज जमा करण्याची अंतिम मुदत या महिन्याच्या सुरुवातीला संपली. फ्युचर रिटेल एकेकाळी देशातील दुसऱया क्रमांकाची रिटेलर होती. कर्ज चुकवल्यानंतर बँकांनी त्यांना दिवाळखोरीच्या प्रक्रियेत ओढले आहे. फ्युचर रिटेलला त्यांची मालमत्ता रिलायन्स इंडस्ट्रीजला 3.4 बिलियन डॉलरमध्ये विकायची होती, परंतु ऍमेझॉन आयएनसीच्या कायदेशीर आव्हानामुळे ते व्यवहार करू शकले नाहीत आणि कर्जात बुडाले.
2024 पर्यंत 100 लाख कोटी किरकोळ बाजार
भारताची किरकोळ बाजारपेठ सुमारे 900 अब्ज डॉलर्स (सुमारे 69 लाख कोटी रुपये) उलाढालीची आहे. 2024 पर्यंत ते 1.3 ट्रिलियन डॉलर्स (सुमारे 100 लाख कोटी रुपये) असणे अपेक्षित आहे. यामुळेच मोठय़ा कंपन्यांना भारताचे रिटेल ऑनलाइन मार्केट तसेच ऑफलाइन मार्केट शक्य तितके हातात घ्यायचे आहे.