काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांची स्पष्टोक्ती : सेनेतील बंडखोरीचा जिल्ह्याच्या राजकारणावर परिणाम नाही : एका प्रवृत्तीच्या विरोधात आम्ही एकत्रच.
प्रतिनिधी/कोल्हापूर
जिल्ह्याच्या राजकारणात एका प्रवृत्तीच्या विरोधात खासदार संजय मंडलिक यांच्यासह आम्ही सर्वजण एकत्र आलो आहे. त्यामुळे मंडलिक शिवसेनेतून शिंदे गटात गेले असले तरी आम्ही सर्व एकत्रच आहोत. जिल्ह्यातील गोकुळ, जिल्हा बँकेसह अन्य सहकारी संस्थांचे राजकारण हे पक्षविरहीत असल्यामुळे त्यावर देखील फारसा परिणाम होणार नाही, अशी स्पष्टोक्ती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार बैठकीत केली.
काँग्रेस कमिटीच्या कार्यालयामध्ये आमदार पाटील यांनी जनता दरबाराचे आयोजन केले होते. यावेळी जिह्यातील असंख्य नागरीकांनी आपल्या समस्या, व्यथा मांडल्या. महसूलसह विविध शासकीय विभागातील प्रलंबित कामे, आजरा तालुक्यात महापूरामुळे झालेले नुकसान, शहरातील खड्डे यासह अन्य सार्वजनिक प्रश्न जिह्यातील नागरीकांनी आमदार पाटील यांच्यासमोर मांडले. यावेळी त्यांनी संबंधित विभागातील अधिकाऱयांशी थेट दुरध्वनीद्वारे संपर्क साधून नागरीकांची बहुसंख्य कामे मार्गी लावली. सकाळी 9 ते दूपारी 4 वाजेपर्यंत आमदार पाटील यांनी काँग्रेस कमिटी कार्यालयामध्येच ठिय्या मारून जनतेच्या अडीअडचणी समजावून घेतल्या.
जनता दरबारानंतर आयोजित पत्रकार बैठकीत बोलताना आमदार पाटील यांनी शिवसेनेतील बंडाळीनंतर जिल्ह्याच्या राजकारणावर कोणताही परिणाम होणार नसल्याचा दावा केला. दिल्लीला जाण्यापूर्वी खासदार मंडलिक यांच्याशी माझी 2 ते 3 तास चर्चा झाली. यावेळी शिंदे गटात त्यांनी जाऊ नये यासाठी मी आग्रह केला होता. पण शिंदे गटात जाण्यापूर्वी आठ दिवस खासदार मंडलिक डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संपर्कात होते. त्यामुळे शिंदे गटात सहभागी होण्याची त्यांची मानसिकता झाल्यामुळे मंडलिक यांना रोखू शकलो नाही. पुढील दोन वर्षात मतदारसंघासाठी भरघोस निधी मिळेल यात्री खात्री असल्यामुळेही ते शिंदे गटात गेले असावेत असे आमदार पाटील यांनी स्पष्ट केले.
हे ही वाचा : काही लोकांना सत्तेशिवाय जमत नाही
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर पुढील राजकीय दिशा ठरणार
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर राज्यासह जिल्ह्यातील पुढील राजकीय दिशा ठरणार आहे. शिंदे गटाच्या 40 आमदारांना आगामी निवडणुकीत भाजप उमेदवारी देणार काय ? हा प्रश्न आहे. तसेच शिवसेनेचे जे 12 खासदार शिंदे गटात गेले, त्यांच्याबाबत भाजपने अद्याप कोणतीही भूमिका घेतलेली नाही. न्यायालयाच्या निकालावरच सर्व राजकीय समीकरणे निश्चित होणार आहेत, असे आमदार पाटील यांनी सांगितले.
नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी
नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये कुरुंदवाड, गडहिंग्लजसह शक्य त्या ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादीची आघाडी होईल. मूरगुड नगरपालिकेच्या गतनिवडणुकीत खासदार मंडलिक आणि आमदार मुश्रीफ एकत्र होते. पण आता बदललेल्या राजकीय समीकरणानुसार तेथे काय होणार ? हे अद्याप अस्पष्ट असल्याचे आमदार पाटील यांनी विषद केले.