ऑनलाईन टीम/तरुण भारत
भाजप नेते आणि खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) यांनी आज पुण्यात बंडखोर शिंदे गटातील कॅबिनेटमंत्री दीपक केसरकर यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी अनेक गोष्टींवर चर्चा केली. यावेळी शिवसेनेतील बंडखोरी आणि शिवसेना कुणाची यावर बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाला टोला लगावला आहे. “संपूर्ण महाराष्ट्र माझा आहे. शिवसेना शिवाजी महाजारांच्या नावाने स्थापन केली, मग मी म्हणायचं का शिवसेना माझी आहे” असा प्रश्न उदयनराजेंनी केला.
खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, संपूर्ण महाराष्ट्र माझा आहे. शिवसेना माझी आहे, असं म्हणू का?, छत्रपती शिवाजी महाराज हे राजे होते. येथे जाणता राजा देखील एकच आहे. शिवसेना शिवाजी महाराजांच्या नावाने स्थापन झालीये, मग काय मी म्हणायचं का शिवसेना माझी आहे, असं खासदार उदयनराजे भोसले म्हणाले.
“लोकशाहीमध्ये संपूर्ण महाराष्ट्र हा लोकांचा आहे. लोकांच्या माध्यमातून कुठल्याही पक्षातील आमच्यासारखे लोकप्रतिनिधी मग ते आमदार असो वा खासदार निवडून जातात. त्यामुळे हा छत्रपतींचा महाराष्ट्र लोकांचा महाराष्ट्र आहे,” असं उदयनराजे भोसलेंनी म्हटलं.
साताऱ्याने पहिल्यापासून महाराष्ट्राला नाही, तर देशाला दिशा दिलीय. साताऱ्यात सर्व चळवळी उभ्या राहिल्या होत्या. मी नेता नाहीये. वाटतेय का मी नेता असल्यासारखे, बघितलेय का, असा सवाल उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला.