कार्लोस अल्कारेज, आर्यना साबलेन्का, कॅरोलिना प्लिस्कोव्हा उपांत्यपूर्व फेरीत
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
विजेतेपदाचा मुख्य दावेदार असलेल्या स्पेनच्या राफेल नदालला अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या चौथ्या फेरीतच धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. अमेरिकेच्या फ्रान्सेस टायफोने त्याचे आव्हान संपुष्टात आणत सर्वात मोठा अपसेट निकाल नोंदवला. कार्लोस अल्कारेजनेही माजी विजेत्या मारिन सिलिकला धक्का देत उपांत्यपूर्व फेरी गाठली. याशिवाय आर्यना साबालेन्का, कॅरोलिना प्लिस्कोव्हा, यानिक सिनेर यांनीही उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले तर इव्हाश्का, क्हिक्टोरिया अझारेन्का, कॉलिन्स स्पर्धेबाहेर पडले.
22 व्या मानांकित टायफोने ‘मॅच ऑफ द लाईफ’ ठरलेल्या सामन्यात दुसऱया मानांकित नदालला 6-4, 4-6, 6-4, 6-3 असे हरवित उपांत्यपूर्व फेरी गाठली. 23 वे ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या प्रयत्नात असणाऱया नदालला या मोसमात दुसऱया ग्रँडस्लॅम स्पर्धेत पराभव स्वीकारावा लागला आहे. विजयी गुण पटकावल्यानंतर टायफोने हाताने चेहरा लपवून प्रेक्षकांच्या अभिनंदनाचा स्वीकार केला. ‘या क्षणी काय बोलावे मला सुचत नाही. आनंदापेक्षाही पलीकडे असलेली ही भावना आहे. त्याक्षणी माझ्या डोळय़ांत अश्रूच दाटले होते,’ असे नंतर बोलताना तो म्हणाला. रशियाच्या आंद्रे रुबलेव्हशी त्याची उपांत्यपूर्व लढत होणार आहे.
अल्कारेजचा सिलिकला धक्का
19 वर्षीय कार्लोस अल्कारेजने 2014 चा चॅम्पियन मारिन सिलिकवर 6-4, 3-6, 6-4, 4-6, 6-3 अशी चुरशीच्या लढतीत मात केली. त्याला येथे तिसरे मानांकन मिळाले असून त्याला संभाव्य विजेत्यापैकी एक मानले जात आहे. त्याची पुढील लढत इटलीच्या यानिक सिनेरशी होईल. सिनेरने अल्कारेजवर आतापर्यंत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. याच वर्षी सिनेरने हे दोन्ही विजय मिळविले आहेत. इटलीच्या 11 व्या मानांकित यानिक सिनेरने पाचव्या सेटमध्ये 1-3 असे पिछाडीवर असतानाही त्याने झुंजार खेळ करीत बेलारुसच्या इलिया इव्हाश्कावर 6-1, 5-7, 6-2, 4-6, 6-3 अशी मात करीत विजय साकार केला. इव्हाश्काने या स्पर्धेत इथवर मजल मारताना सॅम क्वेरी, हय़ुबर्ट हुरकाझ, लॉरेन्झो मुसेटी यांना हरविण्याचा पराक्रम केला होता.
साबालेन्काचा विजयासाठी संघर्ष
महिला एकेरीत सहाव्या मानांकित आर्यना साबालेन्का बहरात असलेल्या 19 व्या मानांकित डॅनियली कॉलिन्सचे आव्हान 3-6, 6-3, 6-2 असे संपुष्टात आणत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. कॉलिन्सवर मिळविलेला तिचा हा चौथा विजय आहे. तिची उपांत्यपूर्व लढत कॅरोलिना प्लिस्कोव्हाशी होईल. साबालेन्का-प्लिकोव्हा यांच्यात आतापर्यंत चार लढती झाल्या असून दोघींनी प्रत्येकी 2 लढती जिंकल्या आहेत. झेकच्या 22 व्या मानांकित प्लिस्कोव्हाने बेलारुसच्या अनुभवी व्हिक्टोरिया अझारेन्काला 7-5, 6-7 (5-7), 6-2 अशा तीन सेट्सच्या लढतीत नमवून आगेकूच केली. प्लिकोव्हा 2016 मध्ये या स्पर्धेत उपविजेतेपद मिळविले होते तर आणखी तीनदा तिने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती.