मनपा बैठकीत ठराव
प्रतिनिधी /पणजी
सांत इनेज येथील स्मशानभूमिला जोडून असलेल्या कब्रस्थानमध्ये बेकायदेशीररित्या नमाज पठण करण्यात येत असल्याने ते त्वरित थांबवावे, तसेच तेथे कोरण्यात आलेली ’मशिद आणि कब्रस्थान’ या नावाची पाटीही काढून टाकावी, अशी जोरदार मागणी पणजी महानगरपालिकेच्या बुधवारी झालेल्या बैठकीत करण्यात आली. त्यावर एका आठवडय़ाच्या आत सदर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन पालिका आयुक्त आग्नेल फर्नांडीस यांनी दिले.
प्रत्यक्षात ही मागणी नवीन नव्हे. उदय मडकईकर महापौरपदी असतानाही सदर प्रकार सुरू होता आणि तेव्हाच तो बंद करण्याचा ठराव घेण्यात आला होता. मात्र अद्याप त्याची कार्यवाही झालेली नसल्याने कालच्या बैठकीत संताप व्यक्त करण्यात आला. त्यावर आता मागील ठरावाचीच अंमलबजावणी करण्यात यावी यासंबंधी सर्व नगरसेवकांचे एकमत झाले. त्यानुसार आयुक्तांनी कारवाईचे आश्वासन दिले.
सांतइनेज येथे हिंदू स्मशानभूमिला जोडूनच कब्रस्थान आहे. ही संपूर्ण जमीन महापालिकेच्या मालकीची आहे. सरकारी मालकीच्या जमिनीत कोणतेही धार्मिक कार्य, व्यवहार करता येत नाही. तरीही राजकीय पाठबळ आणि सरकारी अधिकाऱयांच्या दुर्लक्षाचा फायदा घेत काही मुस्लीम बांधवांनी तेथे नियमित नमाज पठण चालू केले होते. हा प्रकार एवढय़ावरच न थांबता कब्रस्थानच्या भिंतीवर नावाची पाटीही कायमस्वरुपी बसविण्यात आली होती. नियमित होणाऱया नमाज पठणावेळी स्मशानभूमित जाणारी वाट अडविली जात होती. परिणामी त्याचवेळी एखादा मृतदेह घेऊन आल्यास त्यांना नमाज संपून वाट मोकळी होण्याची प्रतीक्षा करत राहावी लागत होती.
येथे शक्तीप्रदर्शन करण्याच्या हेतूने सांतीनेज बाहेरील परिसरातील मुस्लीमांना मोठय़ा संख्येने बोलावून जमाव करण्यात येत होता. त्याशिवाय नमाजानिमित्त दिवसातून तीन ते चार वेळा मोठय़ाने लाऊडस्पीकर वाजविण्यात येत असल्याने परिसरात आवाजाचे प्रदूषण होत असल्याच्या स्थानिकांच्या कित्येक तक्रारी मनपापर्यंत पोहोचल्या होत्या. त्यामुळे सदर सर्व प्रकार बंद करण्यात यावे, अशी मागणी करणारा ठराव घेण्यात आला होता, अशी माहिती उदय मडकईकर यांनी बैठकीत दिली.
नमाज पठणाचा सदर प्रकार आता एवढा विकोपास पोहोचला आहे की मुस्लीमांच्याच अन्य एका गटाने त्यास जोरदार विरोध केला आहे, अशी माहितीही यावेळी देण्यात आली. त्यानंतर सदर प्रश्नी जोरदार चर्चा होऊन अखेरीस मागील ठरावाचीच अंमलबजावणी करण्यात यावी, असे सर्वांनुमते ठरविण्यात आले. त्यावर आयुक्त फर्नांडीस यांनी आठवडाभरात कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
व्यावसायिक इमारतींचे घरपट्टी शुल्क कमी करणार
बैठकीत अन्य अनेक महत्वाच्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली. त्यात प्रामुख्याने पाटो पणजी येथील व्यावसायिक इमारतींना लागू असलेल्या घटपट्टी शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्यासंबंधी माहिती देताना महापौर रोहित मोन्सेरात यांनी, पाटो येथील ए क्लास व्यावसायिक इमारतीमधील कार्यालये तसेच व्यावसायिकांकडून घरपट्टी जादा असल्याची तक्रार करण्यात आली होती. तसेच सदर शुल्क कमी करावे, अशी मागणी त्यांनी केली होती, अशी माहिती दिली. सदर मागणी विचारात घेऊन त्यानुसार शुल्क 12 टक्क्यांवरून 10 टक्के करण्यात आले आहे. त्याची अंमलबजावणी पुढील महिन्यापासून करण्यात येणार आहे. तोपर्यंत विद्यमान घरपट्टीच भरावी लागणार आहे, असेही श्री. मोन्सेरात यांनी सांगितले.
या बैठकीत नगरसेवक उदय मडकईकर, सुरेंद्र फुर्तादो, रूथ फुर्तादो, कबिर माखिजा, बेंतो लॉरेन्स, शुभम चोडणकर, अस्मिता केरकर आदींनी विचार मांडले.