चित्ताकुला ग्रामपंचायतीचा निर्णय : अध्यक्षांकडून माहिती
प्रतिनिधी /काणकोण
विकासकामांच्या बाबतीत कर्नाटक राज्यात दुसऱया आणि कारवारमध्ये पहिल्या क्रमांकावर असलेल्या चित्ताकुला सदाशिवगड ग्रामपंचायतीने आपल्या पंचायत क्षेत्रात कन्नडबरोबर कोकणीतून नामफलक लावण्याचा आणि अन्य व्यवहार करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती पंचायत मंडळाच्या अध्यक्षा स्वाती देसाई आणि उपाध्यक्षा रिना वायंगणकर यांनी दिली.
कारवार पट्टय़ात एकूण 18 पंचायती असून चित्ताकुला पंचायतीची मतदारसंख्या 17 हजार, तर 22 हजार इतकी लोकसंख्या आहे. या पंचायतीने आपल्या कार्यक्षेत्रात रस्ते, गटारदुरुस्ती, आठवडय़ाचा बाजार त्याचप्रमाणे कचरा प्रक्रिया प्रकल्प राबविण्याचे काम करतानाच स्वच्छ भारतचा संदेश दिला आहे. या पंचायतीचे एकूण 36 सदस्य आहेत. या परिसरातील 99 टक्के लोकांचा व्यवहार कोकणीतून चालतो. येथील संस्कृती, आचार-विचार कोकणीतूनच चालतात. भारतीय घटनेनुसार प्रत्येकाला आपल्या बोली भाषेतून व्यवहार करण्याचा अधिकार आहे. याचा विचार करून राजभाषा कन्नडबरोबरच या ठिकाणचे रस्ते आणि अन्य ठिकाणी देवनागरी कोकणीतून नामफलक लावण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे. या निर्णयाचे कारवारच्या कोकणी स्वाभिमानी नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत केले आहे.