ऑनलाईन टीम / तरुण भारत :
राष्ट्रपती भवनामध्ये असलेल्या मुघल गार्डनचं मोदी सरकारने नामकरण केले आहे. ‘अमृत उद्यान’ या नावाने आता मुघल गार्डन ओळखले जाईल. 31 जानेवारीपासून हे गार्डन सर्वसामान्यांसाठी खुले होत आहे.
मुघल गार्डन म्हणजेच अमृत उद्यान हे विविध प्रकारच्या फुलांसाठी प्रसिद्ध आहे. राष्ट्रपती भवनातील 15 एकर जागेत असलेल्या या उद्यानाची रचना इंग्रज वास्तुविशारद एडवर्ड लुटियंस यांनी केली आहे. या उद्यानातील फुलांचे सौंदर्य पाहण्यासाठी दरवर्षी देश-विदेशातून लोक येत असतात. यंदा देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाल्यामुळे देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. त्यामुळे राष्ट्रपतींनी राष्ट्रपती भवनाच्या या उद्यानाला अमृत उद्यान असे नाव दिले आहे.
अधिक वाचा : हवाईदलाची तीन विमानं दुर्घटनाग्रस्त
31 जानेवारीपासून 26 मार्चपर्यंत हे उद्यान सर्वसामान्यांसाठी खुले असणार आहे. या उद्यानात 70 विविध प्रजातींच्या सुमारे 5 हजार हंगामी फुलांच्या प्रजाती आहेत. त्यामध्ये 138 प्रकारचे गुलाब, 10 हजार पेक्षा जास्त टय़ूलिप बल्ब आहेत. देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी हे उद्यान सर्वसामान्यांसाठी खुले केले होते. तेव्हापासून दरवर्षी वसंत ऋतूमध्ये हे उद्यान जनतेसाठी खुले केले जाते.