केंद्र-राज्य सरकारच्या प्रयत्नांना यश : नंदा तलाव जैविकसंपदेचा खजिना
राजेंद्र केरकर /पणजी
दक्षिण गोव्यातल्या कुडचडे-काकोडा नगरपालिका क्षेत्रात येणाऱया नंदा तलावाचा समावेश आंतरराष्ट्रीय रामसर यादीत भारत सरकारने केल्याने गोवा सरकारने आरंभलेल्या प्रयत्नाला नेत्रदीपक यश लाभलेले आहे. भारत सरकारने अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिना प्रीत्यर्थ 75 पाणथळ स्थळांना रामसर यादीत मान्यता मिळावी म्हणून आरंभलेल्या प्रस्तावात गोव्यातल्या नंदा तलावाचा समावेश केल्याने राज्याच्या नैसर्गिक वैभवाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळणार आहे.
केपे तालुक्यातील कुडचडे मतदारसंघात येणाऱया नंदा तलावाला आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या पाणथळांच्या यादीत स्थान मिळावे यासाठी गोवा जैवविविधता मंडळाचे अध्यक्ष तथा या भागाचे आमदार नीलेश काब्राल यांनी या प्रस्तावाचे समर्थन केले. त्यामुळे भारत सरकारने नव्याने सादर केलेल्या देशभरातल्या दहा पाणथळीच्या स्थळांच्या यादीत नंदा तलावाचा समावेश झालेला आहे.
जैविक संपदेचा खजाना
एकूण 42 हेक्टर क्षेत्रफळात वसलेला हा तलाव देश-विदेशांतून येणाऱया पक्षांप्रमाणे जैविक संपदेच्या नानाविविध घटकांना जीवनाधार ठरलेला आहे. पाणकावळे, धीवर, बदके, ब्राह्मी घार अशा पक्ष्यांसाठी नंदनवन ठरलेल्या या तलावाच्या गोडय़ा पाण्याचा वापर इथल्या वायंगणी शेतीला व्हायचा. चवदार माशांची पैदास या तलावात होत असल्याने या परिसरातल्या मत्स्यप्रेमी खवय्यांना पौष्टिक आहाराची रसद उपलब्ध होत असे.
काकोडे गावातील नंदा तलाव
केपे तालुक्यातील काकोडे हा गाव खाणपट्टय़ात येत असला तरी इथल्या निसर्ग, पर्यावणावरती प्रेम कणाऱया कष्टकऱयांनी देवराया, देववृक्ष यांच्या माध्यमातून शेकडो वर्षापासून जैविक संपदा आणि पर्यावरणीय परिसंस्थांचे संवर्धन आणि संरक्षण आत्मियतेने केलेले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सरकारतर्फे नंदा तलावाच्या प्रस्तावाला मान्यता दिल्याने भारत सरकारच्या केंद्रीय वन, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालयाने हे नैसर्गिक वारसा स्थळ आंतरराष्ट्रीय स्तरावरती पोहोचविले आहे.
पोर्तुगीज काळात पुस्तकांमध्ये नंदा तलाव
पोर्तुगीज काळातल्या मराठी, भुगोल पुस्तकात समावेश असणाऱया नंदा तलावाचे गोवा मुक्तीनंतर सरकारी यंत्रणेला प्रदीर्घ काळ विस्मरण झाले होते. त्यामुळे राज्यातील तळय़ा, तलाव इतिहासजमा होण्याच्या मार्गावर होते आणि अशा पार्श्वभूमीवरती कुडचडे-काकोडा नगरपालिका क्षेत्रातील या तलावाला पाणथळ स्थळाचा आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त होण्याचा मार्ग भारत सरकारने अधिकृतरित्या खुला केलेला आहे.
गोवा जैवविविधता मंडळाचे सदस्य सचिव डॉ. प्रदीप सरमोकादम यांनी सातत्य़ाने सरकार आणि स्थानिक पातळीवरच्या विविध घटकांशी आत्मियतेने प्रयत्न करून नंदा तलावाच्या प्रस्तावाचा पाठपुरावा केलेला होता. या साऱया प्रयत्नांची फलश्रुती म्हणून नंदा तलावाचा भारत सरकारने पाठवलेल्या यादीत समावेश जाल्याने गोव्याच्या पर्यावरणीय इतिहासात ही घटना संस्मरणीय ठरलेली आहे. या तलावाचे नैसर्गिक वैभव आणि पर्यावरणीय पैलूचे संरक्षण आणि संवर्धन करण्यास गोवा सरकारने स्थानिक जनतेच्या सहभागाद्वारे प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे.