भाजीपाल्याचे दर वाढल्याने हैराण झालेल्या नागरिकांना आता दूध दरवाढीचा ‘चटका’ बसणार आहे. राज्य सरकारने नंदिनी दूध दरात प्रतिलिटर ३ रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. १ ऑगस्टपासून ही दरवाढ लागू होणार आहे. त्यामुळे जनतेच्या खिशावर आणखी ताण पडणार आहे.
राज्यातील दूध उत्पादक संघटनांनी काही दिवसांपूर्वी दूध दरवाढीचा प्रस्ताव कर्नाटक दूध महामंडळाकडे (केएमएफ) सादर केला होता. त्यानुसार मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शुक्रवारी रात्री दूध उत्पादक संघटना आणि केएमएफच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी केएमएफने प्रतिलिटर ५ रुपये दूध दरवाढ करण्याचा प्रस्ताव मांडला. मात्र, सिद्धरामय्यांनी प्रतिलिटर ३ रुपये दूध दरवाढीला संमती दर्शविली. त्यामुळे ग्राहकांना दुधासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. दरवाढीची रक्कम दूध उत्पादकांना दिली जाणार आहे. दूधउत्पादकांकडून खरेदी होणाऱ्या दरातही १ ऑगस्टपासून २ रुपयांनी वाढ केली जात आहे.
दूध दरवाढीच्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी मागील आठवड्यातच मुख्यमंत्र्यानी बैठक बोलावली होती. मात्र, मुख्यमंत्री सिद्धरामय्या आजारी असल्याने ही बैठक झाली नव्हती. शुक्रवारी रात्री मुख्यमंत्रांचे गृहकार्यालय ‘कृष्णा’ येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीत दुधाचा दर प्रतिलिटर ३ रुपयांनी वाढविण्यास संमती दर्शविण्यात आली. दूध पावडरचा दरही वाढविण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. मात्र, त्याविषयी अंतिम निर्णय झाला नसल्याचे सूत्रांकडून समजते.
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सहकारमंत्री के. एन. राजण्णा यांनी, बैठकीत केएमएफच्या अधिकाऱ्यांनी ५ रुपये प्रतिलिटर दूध दरवाढीची मागणी केली. मात्र, सरकारने ३ रुपये दरवाढीला मान्यता दिली आहे , असे सांगितले. बैठकीत केएमएफचे अध्यक्ष आमदार भीमा नायक, माजी मंत्री एच. डी. रेवण्णा तसेच केएमएफचे सर्व संचालक, सहकार खात्याचे अधिकारी उपस्थित होते.