स्थानिक आणि आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या विरोधानंतर टोलवसुली थांबविली
खानापूर/प्रतिनिधी
खानापूर गणेबैल येथे बेळगाव गोवा रस्त्यावर शनिवारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पुन्हा टोल आकारणीसाठी प्रयत्न केला. मात्र टोल आकारणी सुरू असल्याची माहिती मिळताच शेतकरी तसेच स्थानिक जनता आणि आमदार विठ्ठल हलगेकर भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी भाजपाध्यक्ष तालुकाध्यक्ष संजय कुबल, समितीचे नेते मुरलीधर पाटील यांनी यावेळी जोरदार विरोध केला. दरम्यान याठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस फौज फाटा तैनात करण्यात आला होता.
टोल आकारणी विरोधानंतर याबाबतची माहिती प्रांताधिकार्यांना देण्यात आली. प्रांताधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले तसेच महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारीही या ठिकाणी उपस्थित होते. या सर्वांशी चर्चा केल्यानंतर आजची टोल आकारणी थांबविण्यात आली. ही टोल आकारणी पोलीस बंदोबस्तात कधीही सुरू होऊ शकते, असे स्पष्ट संकेत राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांनी दिले आहेत. चार दिवसात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊनच पुढील निर्णय घेण्यात येईल, असे प्रांताधिकार्यांनी सांगितले.