ऑनलाईन टीम / मुंबई :
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM uddhav thackreay) यांचे निवासस्थान असलेल्या “मातोश्री” (matoshree) बंगल्याबाहेर हनुमान चालीसा पठण (recite hanuman chalisa) करण्यासाठी खासदार नवनीत राणा (navneet rana) आणि आमदार रवी राणा (ravi rana) हे दाम्पत्य शिवसैनिकांना चकवा देत मुंबईत दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. राणा यांच्या युवा स्वाभिमानी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी हा दावा केला आहे.
राणा दाम्पत्य आपल्या पदाधिकाऱ्यांसह उद्या (23 एप्रिल) मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठण करणार आहे, तसे त्यांनी जाहीर केले होते. राणा दाम्पत्य मुंबईत येणार असल्याने शिवसेना आक्रमक झाली असून, मातोश्रीबाहेर शिवसैनिकांचा पहारा वाढला आहे. राणा दाम्पत्य विदर्भ एक्स्प्रेसने मुंबईत येणार होते. त्यामुळे त्यांना रोखण्यासाठी शिवसेनेने बडनेरा आणि मुंबईतील सीएसएमटी रेल्वे स्थानकावर सकाळपासूनच फिल्डिंग लावली होती. मात्र, राणा दाम्पत्य शिवसैनिकांना चकवा देत विमानाने मुंबईत दाखल झाले आहे. या दाम्पत्यासोबत संघटनेचे 500 ते 700 पदाधिकारीही मुंबईत दाखल झाल्याचे सांगण्यात येते.
सध्या नवनीत राणा आणि रवी राणा या गेस्ट हाऊसमध्ये असल्याची माहिती आहे. मातोश्रीबाहेर शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली असून, राणा दाम्पत्याने मातोश्रीवर येऊन दाखवावे, आम्ही सज्ज आहोत, असे आव्हान शिवसैनिकांकडून देण्यात आले आहे.