सिद्धार्थ अन् आर. माधवन मुख्य भूमिकेत
चित्रपट अभिनेता सिद्धार्थ, नयनतारा आणि आर. माधवन हे एकत्र काम करण्यावरून अत्यंत उत्साहित आहेत. हे तिन्ही दिग्गज कलाकार ‘टेस्ट’ या चित्रपटातून एकत्र झळकणार आहेत. या चित्रपटाचे चित्रिकरण बुधवारी सुरू झाले आहे. टेस्ट या चित्रपटाचे दिग्दर्शन एस. शशिकांत करणार आहेत. शशिकांत यांचे हे दिग्दर्शकीय पदार्पण असेल.
माधवन आणि नयनतारा यांच्यासोबत काम करण्याकरता उत्सुक असल्याचे सिद्धार्थने सोशल मीडियावर म्हटले आहे. चित्रपटाचे एक पोस्टर शेअर करण्यात आले असून यात तिन्ही कलाकारांची रेखाचित्रे दिसून येतात. ‘टेस्ट’च्या माध्यमातून सिद्धार्थ आणि आर. माधवन हे तिसऱयांदा एकत्र काम करत आहेत. यापूर्वी दोघांनी 2004 आणि 2006 मध्ये प्रदर्शित चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. रंग दे बसंती हा या दोघांचा चित्रपट गाजला होता.
‘टेस्ट’ या चित्रपटाद्वारे नयनतारा ही पहिल्यांदाच आर. माधवन आणि सिद्धार्थ यांच्यासोबत दिसून येणार आहे. हा चित्रपट देशभरात प्रदर्शित होणार आहे. तमिळ, तेलगू, हिंदी, मल्याळी आणि कन्नड भाषेत हा चित्रपट तयार केला जात आहे. आर. माधवन यापूर्वी ‘रॉकेट्री’ या चित्रपटात दिसून आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली होती.