खंडाळा प्रतिनिधी
असवली, शिरवळ येथील गाव कारभाऱ्यांच्या निवडीत सरपंचपदासह सोळा जागांवर राष्ट्रवादीची सरशी झाली. तर भाजपाची पिछेहट झाल्याचे निवडणुकीच्या निकालातून दिसून आले.
खंडाळा शहरातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये निवडणुक निरीक्षक तथा उपजिल्हाधिकारी विजया यादव, तहसिलदार दशरथ काळे यांच्या उपस्थितीत सकाळी दहा वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला.चार टेबल लावण्यात आले होते.त्यासाठी मतमोजणी पर्यवेक्षक, सहायक व इतर असे 20 कर्मचायांची नेमणूक करण्यात आली होती.असवलीत राजेंद्र ससाणे तर शिरवळला सनील बोडरे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहीले.
तालुक्यात संवेदनशील समजल्या जाणार्या असवली आणि शिरवळ ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले होते.असवली ग्रामपंचायतमध्ये राष्ट्रवादी अंतर्गत दोन गट तर भाजपा ,शिंदेगट व मित्रपक्ष अशी राजकीय चुरस दिसुन आली.त्यामध्ये तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष दत्तानाना ढमाळ यांना सरपंच पदाबरोबर अन्य पाच जागांवर विजय मिळविण्यात यश आले.तर दुसर्या गटाला चार जागांवर समाधान मानावे लागले असुन भाजपा – शिंदेगटाला खाते उघडण्यात अपयश आल्याचे दिसून आले.
तालुक्यातील शिरवळ येथे राष्ट्रवादीने सरपंच पदासह अन्य नऊ जागांवर विजय मिळविला आहे.यामध्ये जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उदय कबुले, तालुका पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र तांबे यांनी आपले गड राखत विजयाचा गुलाल घेतला.दरम्यान,भाजपा -दोन,शिंदे गट -तीन,शिवसेना (ठाकरे गट) एक ,तर दोन अपक्षांनी बाजी मारली आहे.