पुणे / प्रतिनिधी :
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (यूपीएससी) खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) आणि केरळमधील एझिमला येथील नौदल अकादमीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. या प्रवेश प्रक्रियेसाठी 10 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे.
एनडीए आणि नौदल अकादमी या देशातील दोन महत्त्वाच्या शैक्षणिक संस्थांची प्रवेश प्रक्रिया ही केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत राबवली जाते. त्याबाबतचे वेळापत्रक आयोगाने नुकतेच प्रसिद्ध केले आहे. फेब्रुवारी 2024 मध्ये होणाऱ्या सत्रासाठी ही प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली असून 10 जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे. 16 एप्रिल 2023 रोजी लेखी परीक्षा घेतली जाणार असल्याचे आयोगाकडून कळवण्यात आले आहे.
अधिक वाचा : वायव्य भारत, उत्तरेत थंडीची लाट
वर्षांतून दोन वेळा केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून ही प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. आता होणारी प्रवेश प्रक्रिया ही एनडीएच्या 151 व्या तर नौदल अकादमीच्या 113 व्या तुकडीसाठी असून, लेखी प्रवेश परीक्षा, मुलाखत आणि वैद्यकीय चाचणी अशा तीन टप्प्यात ही प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली जाते.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन इच्छुक उमेदवार या प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज करू शकणार आहेत. ‘ॲक्टिव्ह एक्झाम’ या पर्यायावर जाऊन प्रवेश अर्ज भरणे शक्य होणार आहे. एनडीएच्या 370 आणि नौदल अकादमीच्या 25 जागांसाठी ही प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत असून, उमेदवारांच्या पात्रतेबाबत आवश्यक माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.