ब्रिटनमधील लेबर पार्टीचे नेते कीर स्टार्मर यांचा संकल्प
वृत्तसंस्था/ लंडन
ब्रिटनमधील विरोधी पक्ष असलेल्या लेबर पार्टीचे नेते कीर स्टार्मर यांनी हिंदूफोबियासंबंधी वक्तव्य केले आहे. हिंदूफोबियाच्या विरोधात आम्ही लढायला हवे. दुही निर्माण करण्याचे राजकारण आणि समुदायांमध्ये द्वेष पसरविणाऱया कट्टरवादी घटकांना समाप्त करण्यासाठी मी प्रतिबद्ध असल्याचे स्टार्मर यांनी म्हटले आहे. कीर स्टार्मर यांनी एका सोहळय़ात ब्रिटिश भारतीयांना संबोधित केले आहे. हिंदूफोबियाला आमच्या समाजात कुठलेच स्थान नाही आणि आम्ही सर्वांनी मिळून याच्या विरोधात लढायला हवे. काही लोकांना धर्माच्या आधारावर लक्ष्य करण्यात येत आहे. तसेच काही वर्षांमध्ये द्वेषयुक्त गुन्हय़ांचे प्रमाण वाढले आहे. सोशल मीडियाचा वापर करत कट्टरवाद्यांकडून पसरविण्यात आलेला द्वेष दूर करावा लागणार असल्याचे स्टार्मर यांनी म्हटले आहे.