वृत्तसंस्था/ काठमांडू
नेपाळच्या क्रिकेट संघाने आपल्या घरच्या मैदानावर पहिली वनडे मालिका जिंकली आहे. नेपाळ आणि संयुक्त अरब अमिरात (युएई) यांच्यात वनडे मालिका खेळविली गेली. या मालिकेतील शेवटच्या आणि निर्णायक सामन्यात नेपाळने युएईचा 6 गडय़ांनी पराभव केला.
शुक्रवारी झालेल्या शेवटच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना संयुक्त अरब अमिरातचा डाव 40.1 षटकात 177 धावात आटोपला. त्यानंतर नेपाळने 4 गडय़ांच्या मोबदल्यात विजयाचे उद्दिष्ट गाठत ही मालिका हस्तगत केली. नेपाळ संघातील सलामीचा फलंदाज असीफ शेखने 119 चेंडूत 12 चौकारांसह नाबाद 88 तर ज्ञानेंद्र मल्लाने 3 षटकार आणि 7 चौकारांसह 64 धावा झळकविल्या. या मालिकेतील गेल्या सोमवारी झालेल्या पहिल्या सामन्यात संयुक्त अरब अमिरातने नेपाळचा 84 धावांनी पराभव केला होता. त्यानंतर नेपाळने दुसऱया सामन्यात संयुक्त अरब अमिरातचा 3 गडय़ांनी पराभव करत बरोबरी साधली होती.