Gokul Shirgaon Kolhapur : भारतीय लोकशाहीचे मंदिर असा गौरव होणाऱ्या संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाघाटन नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. नव्या संसद भवनाचे उद्घाटन वैदिक विधीनुसार झाले.यानंतर नव्या संसदेत सर्व धर्मीयांकडून प्रार्थना करण्यात आली.या माध्यमातून सर्वधर्मसमभावाचा संदेश देण्यात आला.नवी संसद ही वास्तूकलेचा उत्कृष्ट नमुना आहे.या नव्या संसद भवनाच्या उभारणीसाठी तब्बल ८६२ कोटी रुपये खर्च झाले आहेत.नवीन संसद भवनाच्या बांधकामासाठी लागणारे काही साहित्य टेक्नोज अँड प्लास्टोज (Technos in Plastos Kolhapur) गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या कंपनीमध्ये बनवण्यात आले. ही कंपनी दीपक सांगलीकर यांची असून ते 1987 पासून या ठिकाणी काम करत आहेत.
भारताच्या अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या ठिकाणी आज आपण काम केल्याचे एक वेगळेच समाधान मिळत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या चांगल्या कामगिरीबद्दल त्यांचा उद्योजकांची शिखर संस्था असलेल्या गोशीमाने त्यांचा सन्मानही केला.यावेळी तरुण भारत संवादशी बोलताना म्हणाले की, आयआयटी पवई येथील शिक्षण पूर्ण झाल्यावर टाटा इलेक्ट्रिकल या कंपनीमध्ये काही वर्षे नोकरी करून स्वतःचा व्यवसाय चालू केला.त्यांचा सोबत त्यांचा मुलगा गौरव सांगलीकर 2015 पासून प्रोडक्शन इंजिनियर असून या व्यवसायात सहभागी झाला आहे.गेली काही वर्षे बांधकाम क्षेत्रात इन्फ्रास्ट्रक्चर या विभागावर लक्ष केंद्रित करून शटरिंग व फार्म वर्किंग मटेरियल बनवून देशभर आणि बाहेरील देशात देखील पाठवतो आहेत.ऑक्टोंबर 2021 मध्ये टाटा प्रोजेक्ट्स मार्फत या कामाची रिक्वायरमेंट आम्हाला मिळाली,सामान्य स्थिती मध्ये 6ते 8 आठवडे लागणारे काम आमच्या स्टाफ आणि टीम ने मेहनती ग्राहकाची गरज असल्याने हे काम 15 दिवसात पूर्ण केले.
नवीन संसद भवन (New Parliament Building) अर्थात सेंट्रल विस्टा प्रोजेक्टमध्ये बांधकामामध्ये अष्टकोन कॉलमसाठी लागणारे 4.8 मि उंचीचे सिंगल पोर लिफ्टसाठी आम्ही डिझाईन केलेले होते. काँक्रिटमध्ये चांगले फिनिशिंग मिळाल्यामुळे इंजिनिर समाधानी होते. देशासाठी महत्त्वाची इमारत असल्याने आम्ही हा प्रोजेक्ट ना तोटा ना नफा प्रणालीवर पूर्ण केला. हे काम टाटा कंपनी मार्फत आम्ही पूर्ण केले.देशाच्या सर्वात महत्त्वाच्या इमारतीत मुख्य पिलरमध्ये आपले कोल्हापूरचे योगदान आहे याचा आनंद आम्हाला असल्याचे सुद्धा ते यावेळी म्हणाले.