ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पुण्यात अपघातांचा हॉटस्पॉट ठरलेल्या नवले पुलावऱील अपघात रोखण्यासाठी प्रशासनाकडून पावलं उचलण्यास सुरुवात झाली आहे. पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कात्रज नवीन बोगदा ते नवले पुलादरम्यान जड वाहनांची वेगमर्यादा प्रति तास 60 किलोमीटरवरुन प्रति तास 40 किलोमीटर इतकी करण्यात येणार आहे.
रस्ता सुरक्षा समितीच्या वतीने सुचवण्यात आलेल्या उपाययोजनांच्या आढावा बैठकीत पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुखांनी या सूचना केल्या आहेत. कात्रज बोगदा ते नवले पूलादरम्यान जड वाहनांसाठी वेगमर्यादा 60 किमीवरुन 40 किमी प्रतितास इतकी घटवण्याची अधिसूचना तात्काळ काढण्याचे निश्चित करण्यात आले. तसेच या ठिकाणी असलेले काही हॉटेलचालक आणि अन्य व्यावसायिक मुख्य मार्ग आणि सेवा रस्ता यामधील डिव्हायडर तोडत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्या व्यावसायिकांविरोधात कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.
या रस्त्यावर ब्रेक निकामी झालेल्या वाहनांना रस्त्यावरुन बाजूला जाण्यासाठी इमर्जन्सी एस्केप प्लॅनअंतर्गत बाहेर पडण्याचे ठिकाण (एक्झिट रॅम्प) तयार करण्याबाबत पाहणी केली जाणार आहे.