वृत्तसंस्था/ बेलफास्ट (आयर्लंड)
‘सामनावीर’ ग्लेन फिलिप्स आणि लॉकी फर्ग्युसन यांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर सोमवारी येथे झालेल्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने आयर्लंडचा 31 धावांनी दणदणीत पराभव करत विजयी सलामी दिली.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 20 षटकात 8 बाद 173 धावा जमविल्या. त्यानंतर आयर्लंडचा डाव 18.2 षटकात 142 धावात आटोपला.
या सामन्यात न्यूझीलंडच्या डावामध्ये ग्लेन फिलिप्सने 52 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारासह नाबाद 69, ग्युप्टीलने 12 चेंडूत 5 चौकारासह 24, नीशमने 16 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारासह 29, ब्रेसवेलने 13 चेंडूत 1 षटकार 1 चौकारासह 21 धावा जमविल्या. न्यूझीलंडच्या डावात 3 षटकार आणि 17 चौकार नोंदविले गेले. आयर्लंडतर्फे जोश लिटलने 35 धावात 4, ऍडेरने 49 धावात 2 तर डॉक्रेल आणि कॅम्फर यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
प्रत्युत्तरदाखल खेळताना आयर्लंडच्या डावात एकाही फलंदाजाला 30 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. कॅम्फरने 21 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारासह 29, ऍडेरने 3 चौकारासह 25, डॉक्रेलने 3 चौकारासह 15, पॉल स्टर्लिंगने 1 षटकार आणि 1 चौकारासह 13, कर्णधार बॅलबिर्नीने 2 चौकारासह 12, टकेरने 1 चौकारासह 11 धावा जमविल्या. आयर्लंडच्या डावात 2 षटकार आणि 14 चौकार नोंदविले गेले. न्यूझीलंडतर्फे फर्ग्युसनने 14 धावात 4, नीशम आणि सँटनर यांनी प्रत्येकी दोन, डफी आणि सोधी यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक ः न्यूझीलंड 20 षटकात 8 बाद 173 (फिलिप्स 69, नीशम 29, ब्रेसवेल 21, ग्युप्टील 24, लिटल 4-35, ऍडेर 2-49, डॉक्रेल, कॅम्फर प्रत्येकी एक बळी). आयर्लंड 18.2 षटकात सर्व बाद 142 (कॅम्फर 29, ऍडेर 25, डॉक्रेल 15, स्टर्लिंग 13, बॅलबिर्नी 12, टकेर 11, फर्ग्युसन 4-14, नीशम 2-19, सँटेनर 2-36, सोधी, डफी प्रत्येकी एक बळी).