ग्लेन फिलिप्स सामनावीर, देवॉन कॉनवे मालिकावीर
वृत्तसंस्था/ कराची
न्यूझीलंड क्रिकेट संघाने यजमान पाकविरुद्धची तीन सामन्यांची वनडे मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. येथे झालेल्या या मालिकेतील शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडने पाकचा 2 गडय़ांनी पराभव केला. नाबाद अर्धशतक झळकविणाऱया ग्लेन फिलिप्सला सामनावीर तर या मालिकेत दर्जेदार कामगिरी करणाऱया कॉनवेला मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आले. न्यूझीलंड संघाने 2008 नंतर प्रथमच उपखंडात पहिलीच वनडे मालिका जिंकली आहे.
या शेवटच्या सामन्यात पाकने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 9 बाद 280 धावा जमविल्या. सलामीचा फलंदाज फक्र झमानने शानदार शतक (101) तर मोहम्मद रिजवानने 77 धावांची खेळी केली. सलमानने 45 धावा जमविल्या. न्यूझीलंडतर्फे साऊदीने 3 तर फर्ग्युसनने 2, ब्रेस्वेल आणि सोधी यांनी प्रत्येकी 1 बळी मिळविला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना न्यूझीलंडने 48.1 षटकात 8 बाद 281 धावा जमवित ही मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. न्यूझीलंडच्या डावामध्ये देवॉन कॉनवेने 65 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह 52, कर्णधार विलियमसनने 68 चेंडूत 2 चौकारांसह 53, मिचेलने 1 षटकार आणि 1 चौकारासह 31, ग्लेन फिलिप्सने 42 चेंडूत 4 षटकार आणि 4 चौकारांसह नाबाद 63 आणि सँटेनरने 1 चौकारासह 15 धावा जमविल्या. ऍलेन आणि कॉनवे यांनी पहिल्या गडय़ासाठी 43 धावांची भागीदारी केली. ऍलेन बाद झाल्यानंतर कॉनवे आणि कर्णधार विलियमसन यांनी 65 धावांची भर दुसऱया गडय़ासाठी घातली. विलियमसन आणि मिचेल यांनी तिसऱया गडय़ासाठी 52 धावांची भागीदारी केली. पाकच्या अचूक गोलंदाजीसमोर न्यूझीलंडच्या मधल्या फळीतील फलंदाज लवकर बाद झाले. त्यांचा निम्मा संघ 181 धावात तंबूत परतला होता. पण फिलिप्सने चिवट फलंदाजी करत शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहून आपल्या संघाला 11 चेंडू बाकी असताना शानदार विजय मिळवून दिला. पाकतर्फे मोहम्मद वासीम आणि आगा सलमान यांनी प्रत्येकी 2 तर मोहम्मद नवाज आणि उस्मा मीर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. न्यूझीलंडच्या डावामध्ये 7 षटकार आणि 18 चौकार नोंदविले गेले.
संक्षिप्त धावफलक
पाक 50 षटकात 9 बाद 280 (फक्र झमान 101, मोहम्मद रिजवान 77, आगा सलमान 45, सोहेल 22, साऊदी 3-56, फर्ग्युसन 2-63, ब्रेस्वेल 1-44, सोधी 1-50), न्यूझीलंड 48.1 षटकात 8 बाद 281 (फिलिप्स नाबाद 63, कॉनवे 52, विलियमसन 53, मिचेल 31, ऍलेन 25, लॅथम 16, सँटेनर 15, मोहम्मद वासीम 2-35, आगा सलमान 2-42, मोहम्मद नवाज 1-53, उस्मा मीर 1-61).