|Monday, September 23, 2019
You are here: Home » मनोरंजन » निशिकांत कामत साकारणार फुगेचा खलनायक

निशिकांत कामत साकारणार फुगेचा खलनायक 

हिंदी तसेच मराठीतील अभिनेते-दिग्दर्शक म्हणून ओळखले जाणारे निशिकांत कामत लवकरच आगामी ‘फुगे’ या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहेत. यापूर्वी मराठीत ‘डोंबिवली फास्ट’, ‘लय भारी’ सारख्या सिनेमाचे दिग्दर्शन केल्यानंतर ते ‘फुगे’ या सिनेमाच्या माध्यमातून पडद्यावर झळकणार आहेत. येत्या 10 फेब्रुवारीला प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमात ते भैरप्पा नामक खलनायकाच्या भूमिकेद्वारे प्रेक्षकांसमोर येतील. खलनायक म्हटला तर तो वाईट, क्रूर असा असतो. मात्र, या सिनेमातील निशिकांत यांनी साकारलेला खलनायक अगदी निराळा असून, तो प्रेक्षकांना लोटपोट हसवणारा आहे. स्वप्नील जोशी आणि सुबोध भावे यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात निशिकांत कामत यांनी साकारलेला हा खलनायक सिनेरसिकांसाठी सरप्राईज पॅकेज ठरणार आहे.

स्वप्ना वाघमारे-जोशी दिग्दर्शित ‘फुगे’ सिनेमात निशिकांत कामत गोव्यातील एका गाव गुंडय़ाची व्यक्तिरेखा साकारत असून, हा गुंड जितका रागीट आहे तितकाच प्रेमळ देखील आहे. या सिनेमातील त्याचे संवाददेखील प्रेक्षकांना नादखुळा करणारे ठरणार आहेत. एकच फाईट आणि वातावरण टाईट… अशा धाटणीचे अनेक डायलॉग्स या भैरप्पाचे असल्यामुळे निशिकांत कामतचे हे आगळेवेगळे रूप रसिकांना नक्कीच आवडेल. शिवाय या हटके रोलमधून निशिकांत पहिल्यांदाच विनोदी भूमिकेतून झळकणार असल्याने त्याच्या चाहत्यांसाठी हा सिनेमा खुप खास असणार आहे. इंदर राज कपूर प्रस्तुत तसेच एस टीव्ही नेटवर्क्ससोबत जीसिम्सचे अर्जुनसिंग बऱहान, कार्तिक निशानदार तसेच अश्विन आंचन आणि अनुराधा जोशी यांची निर्मिती असलेल्या या सिनेमात स्वप्नील-सुबोध जोडीबरोबरच प्रार्थना बेहेरे, नीता शेट्टी, आनंद इंगळे, मोहन जोशी आणि सुहास जोशी यांच्यादेखील प्रमुख भूमिका आहेत.