|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » आकृती बिल्डरचं काय झालं?

आकृती बिल्डरचं काय झालं? 

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप यांच्यात जोरदार कलगीतुरा रंगला आहे. दोन्ही पक्ष म्हणताहेत की आम्हाला विकासाच्या मुद्दय़ातच रस आहे. पण प्रत्यक्षात चिखलफेक, शिवीगाळच अधिक चालू आहे.

काँग्रेस हा या पालिकेतील विरोधी पक्ष आहे. सेनेचा उदय झाल्यानंतरही अनेक वर्षे मुंबईत पालिकेची सत्ता होती. तेव्हापासून हा पक्ष मुंबईतील विविध समाजांमध्ये रुजलेला आहे. तीन वर्षांपूर्वीपर्यंत या पक्षाचे देशात आणि राज्यात सरकार होते. पण आता त्याची स्थिती दयनीय झाली आहे.

स्वतःची ताकद वाढवणे तर जाऊच दे. पण सेना-भाजप यांच्यातील भांडणांचा आपोआप लाभ मिळण्याच्या अवस्थेत देखील तो नाही.

मुंबईकर नागरिकांच्या दृष्टीने ही दारुण स्थिती आहे. कारण भांडणारे दोन पक्ष सध्या सत्तेत आहेत. गेली किमान वीस वर्षे त्यांनी मिळूनच पालिकेत राज्य केले आहे. स्थायी, सुधार, आरोग्य सर्व समित्यांमधील प्रस्ताव यांनीच आणले आहेत आणि त्यांनीच संमत करून घेतले आहेत.

आता भाजपवाले पारदर्शकतेविषयी बोलत आहेत. पण, गेल्या पाच वर्षात त्यांनी सेनेच्या भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवलेला नाही.

सेना आपण फार स्वच्छ असल्याचा दावा करते आहे. पण, गेल्या सात वर्षात पालिकेचे ऑडिट त्यांनी होऊ दिलेले नाही ही वस्तुस्थिती आहे. अगदी परवा त्यांची एक नगरसेविका एका बारवाल्याकडून लाच घेताना पकडली गेली आहे. तिला कदाचित पुन्हा तिकीट मिळालेले नसल्याने बारवाल्याची भीड चेपली असावी. मग त्याने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली असावी. अशा न केलेल्या तक्रारी किती असतील याचा एक अंदाज यावरून येऊ शकेल.

सध्या शिवसेना आणि भाजपवाले एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करीत आहेत. किरीट सोमय्या नवनवीन प्रकरणे उपस्थित करीत आहेत. राहुल शेवाळे किंवा अनिल परब यांना पुढे करून सेना त्यांना जबाब देऊ पाहत आहे.

काँग्रेसला यामध्ये खरे तर नामी संधी होती. या दोन्ही पक्षांकडून दिली जाणारी माहिती घेऊन सामान्य माणसाच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करणे त्यांना शक्य होते. त्यासाठी त्यांच्याकडे नारायण राणे किंवा गुरुदास कामत यांच्यासारखे धुरंधर व प्रशासनाचा चांगला अनुभव असलेले लोक आहेत. राणे यांची कारकीर्द पालिकेच्या बेस्ट कमिटीपासून सुरू झाली. गुरुदास हे तर पेंद्रीय मंत्री होते.

पण दुर्दैवाने या नेत्यांचा वेळ संजय निरुपम यांच्याशी भांडण्यातच अधिक जात आहे.

नुकताच मुलुंडमधील डम्पिंग ग्राऊंडचा प्रश्न चर्चेला आला. मुंबईतील देवनारनंतरचे हे दुसऱया क्रमांकाचे डम्पिंग ग्राऊंड आहे. ही कचरापट्टी बंद करून अन्यत्र हलवावी असे आदेश सरकार व न्यायालयाने वारंवार दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने त्यासाठी यंदाच्या 30 जूनची कालमर्यादा ठरवून दिली आहे.

मुलुंडची कचरापट्टी बंद होणार असल्याचे यापूर्वी अनेकदा जाहीर होऊनही झालेले नाही. यात शिवसेनेचे व कचरा कंत्राटदारांचे साटेलोटे आहे असे किरीट सोमय्यांचे म्हणणे आहे. यासंदर्भातील एका गुप्त अहवालाचा हवालाही किरीट देतात. त्यानुसार, या कचरापट्टीत एकाच वाहनाने कचरा टाकला असला तरी त्याचा क्रमांक दाखवून दोन दोन कंत्राटदारांनी बिले उकळली आहेत. काही वाहनांचे क्रमांकही बोगस आहेत. कारण हे वाहनांचे क्रमांक दुचाकींचे आहेत.

मुलुंड कचरापट्टी बंद न होऊ देण्यामागे सेनेचा काही स्वार्थ आहे असे सोमय्या म्हणतात. त्यासंदर्भात ते आकृती बिल्डर्सचे नाव घेतात. त्याच्याकडून खंडणी उकळली गेली असा थेट आरोप ते करतात.

दुसरीकडून शिवसेनेचे खासदार यांनी किरीट यांचे हे आरोप फेटाळले आहेत. गंमत म्हणजे त्यांनीही आकृती बिल्डर्सचेच नाव घेतले आहे. भाजप नेत्यांशी त्याचे साटेलोटे असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

दोन्ही बाजू आकृती बिल्डर्सचे नाव घेतात. त्यांचे मुलुंड भागात प्रकल्प चालू आहेत. या बिल्डरचे नाव पूर्वी एसआरए व इतर काही प्रकरणांमध्ये आलेले आहे. मात्र, कचरापट्टीच्या प्रकरणात नेमकी त्याची भूमिका काय आणि दोन्ही पक्षांची भूमिका काय याचा स्पष्ट खुलासा किरीट किंवा शेवाळे यांचे म्हणणे ऐकून कळत नाही.

काँग्रेससारख्या तिसऱया पक्षांची जबाबदारी खरी तर ही आहे की त्यांनी हा भंडाफोड करायला हवा. सामान्य नागरिकांची बाजू घेऊन यातला नेमका घोटाळा काय हे उघड करायला हवे. मुंबई पालिकेत काँग्रेसचे इतके प्रभावी नगरसेवक आहेत. त्यांच्यामार्फत काँग्रेसला हे सहज करता येऊ शकते.

पण काँग्रेसकडे तशी ना इच्छा आहे ना इच्छाशक्ती.

सेनेने आपला वचननामा प्रसफत केला. भाजपनेही गाजावाजा करून जाहीरनामा प्रसिद्ध केला. काँग्रेसचा मात्र जाहीरनामा कधी आला हे कळलेलेही नाही. भाजपची वॉररुम जवळपास चोवीस तास चालू आहे. शिवसेनेने सोशल मीडियावर आक्रमकपणे प्रचार चालवला आहे. काँग्रेसमध्ये मात्र सर्व मामला थंड आहे.

दोघांचे भांडण चालू आहे. तरीही काँग्रेस मात्र थंड आहे.

Related posts: