|Saturday, February 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » संरक्षित केलेली 32 कासवपिल्ले झेपावली समुद्रात!

संरक्षित केलेली 32 कासवपिल्ले झेपावली समुद्रात! 

प्रतिनिधी/ रत्नागिरी

कोकण किनारपट्टीवर जैवविविधतेची कमतरता नाही. त्या संवर्धनासाठी स्थानिक नागरिकांच्या मदतीने वनविभागाने कासव संवर्धनाची मोहीम हाती घेतली आहे. रत्नागिरी तालुक्यामधील गावखडी येथील किनारपट्टीवर यावर्षी प्रथमच भरती रेषेच्या आत वाळूत घातलेली अंडी रेषेबाहेर 10 घरटी तयार करुन त्यात ठेवण्यात आली. ऑलिव्ह रिडले कासवांची 1072 अंडी होती. रविवारी त्या अंडय़ातून 32 पिल्ले बाहेर पडल्याने गावखडी येथे ‘कासव उत्सव’ साजरा झाला. निसर्ग यात्री आणि वनविभाग यांच्या प्रयत्नाने झालेल्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

किनारपट्टीवर गेल्या काही वर्षांपासून येथील जैवसंपदा रक्षणाचे पाऊल उचलण्यात आले आहे. त्यासाठी वनविभाग अग्रणी झाला आहे. किनारपट्टीवर आढळून येणाऱया जैवसंपदेच्या रक्षणासाठी त्या-त्या ठिकाणच्या नागरिकांना मार्गदर्शन करून त्यांचे प्रबोधन केले जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्येही सागरी जीवांच्या रक्षणासाठी कमालीची जागरुकता येऊ लागली आहे. किनारपट्टीवर जिल्हाभरात ठिकठिकाणी कासवांची अंडी व पिल्लांची पैदास होत आहे. दापोली. गुहागर या भागात त्यासाठी किनारे संरक्षित करण्यात आले आहेत.

रत्नागिरी तालुक्यातील गावखडी समुद्रकिनाऱयावर यावर्षी प्रथमच कासवांची मोठय़ा प्रमाणात अंडी मिळून आली. त्या ठिकाणी कासवांची एकूण 10 घरटी मिळून आली. त्यामध्ये 1072 अंडय़ांचा समावेश होता. वनविभागामार्फत त्या ठिकाणी तत्काळ संरक्षण संवर्धन मोहीम राबवण्यात आली. त्यासाठी निसर्गयात्रीचे प्रदीप डिंगणकर व भाई रिसबुड यांनी विशेष मेहनत घेतली. विभागीय वनअधिकारी वि. रा. जगताप यांचे मार्गदर्शन त्यासाठी घेण्यात आले. त्या ठिकाणी वनविभागाच्यावतीने प्रदीप तोडणकर हे कासव संरक्षणाचे काम करत आहेत.

कासव अंडय़ांच्या केलेल्या संवर्धनानंतर रविवार 19 मार्च रोजी त्यातून पिल्लांची पैदास होण्यास प्रारंभ झाला आहे. रविवारी सकाळी अंडय़ातून 32 कासवांची पिल्ले बाहेर पडली. डिंगणकर, पाटील, भाई रिसबुड यांना कष्ट सार्थकी लागल्याचे समाधान वाटले. ही बातमी मिळताच परिक्षेत्र वनअधिकारी बा.रा.पाटील, वनपाल ल. भि. गुरव, वनरक्षक गावडे, प्रदीप डोंगरकर, पावसचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद पाटील, उपनिरीक्षक सुनील शिंदे, जि.प.सदस्या सौ.आरती तोडणकर, पं.स.सदस्य सुशांत पाटकर, उपसरपंच अभय तोडणकर, बाबू तोडणकर, पोलीस पाटील विनय बिर्जे, तंटामुक्त समिती अध्यक्ष निनाद पाटील व ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते. अंडय़ातून बाहेर पडलेली कासव पिल्ले समुद्रात झेपावताच त्यांना पाहण्यासाठी उपस्थित असलेल्या ग्रामस्थांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता.

70 दिवस अंडय़ांच्या संरक्षणासाठी दिवस-रात्र लक्ष

यावेळी योगायोगाने 10-12 पर्यटक उपस्थित होते. प्रदीप डिंगणकर हे बी.कॉम. झालेले तरुण गावखडीत राहतात. त्यांनी सतत निरीक्षण ठेवले. मित्रांच्या मदतीने गेले 70 दिवस अंडय़ांच्या संरक्षणासाठी दिवस-रात्र लक्ष ठेवून होते. डिसेंबर, जानेवारी हा कासवांच्या अंडी देण्याचा काळ असतो. रात्रीच्या वेळी मादी समुद्र किनारी येते. तेथे वाळू उकरुन अंडी घालते. त्यानंतर ती समुद्राकडे झेपावते. ऑलिव्ह रिडले कासवे जगभर आहेत. तथापि मोजक्या ठिकाणी ती अंडी घालत असतात. रत्नागिरी जिह्यात यापूर्वी वेळास येथे तेथील नागरिकांनी संरक्षित जागा तयार केल्याने पिल्लांचा जन्म विश्वासार्ह वातावरणात होत आहे.

गावखडी किनारी 10 ठिकाणी उभारली संरक्षक जाळी

सुरुवातीला हा उपक्रम निसर्गयात्री गुपने हाती घेतला. त्याला वनविभाग व पोलीस विभाग यांनी चांगले सहाय्य केले. प्रदीप डिंगणकर यांच्यासोबत राकेश व संकेत पाटील हे दोघे तरुण स्वयंस्फूर्तीने कासव वाचवा मोहिमेत सहभागी झाले. सध्या गावखडी किनाऱयावर 10 ठिकाणी संरक्षक जाळी उभारून भरती रेषेबाहेर कासवांचे पैदास केंद्र सुरु करण्यात आले आहे. भरती रेषेच्या आत जी कासवे अंडी घालतील, अशा कासवांची अंडी उचलून ती भरती रेषेबाहेर खड्डय़ात ठेवण्याचे काम निसर्गयात्रीचे कार्यकर्ते करत आहेत.

ग्रामस्थांच्या पाठिंब्याने मोहीम यशस्वी

ऑलिव्ह रिडले हे कासव संरक्षित प्रजातीमध्ये आहे. कासव किंवा त्याचे अंडे कोणाही माणसाच्या हातात आढळले तर तो अजामीनपात्र गुन्हा आहे. जाळ्य़ांचे नुकसान करुन काही अंडी पळवण्याचा प्रयत्न स्थानिक नागरिकांनी सुरुवातीला केला. पण पोलिसांनी बोलावून संशयितांना आपल्या भाषेत समज दिल्याने हा प्रकार पुढे झाला नाही. विशेष म्हणजे बहुसंख्य गावखडीवासियांनी या मोहिमेला मनापासून उत्स्फूर्त अशा शुभेच्छा दिल्या. त्यामुळे नागरिकांच्या मोठय़ा पाठिंब्याच्या जोरावर यावर्षीची पहिली मोहीम यशस्वी ठरली.

Related posts: