|Friday, November 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘दशक्रिया’ चित्रपटावर रत्नागिरीची छाप!

राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘दशक्रिया’ चित्रपटावर रत्नागिरीची छाप! 

प्रतिनिधी/ रत्नागिरी

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये ‘दशक्रिया’ या मराठी चित्रपटाला यावर्षीचा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. विशेष बाब म्हणजे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त या चित्रपटामध्ये रत्नागिरीतील ज्येष्ठ रंगकर्मी प्रफुल्ल घाग, शेखर जोशी, सौ. कल्पना जोशी, पद्मजा खटावकर या कलाकारांच्या कथानकाला उठाव देणाऱया भूमिका आहेत. रत्नागिरीसाठी निश्चितच ही अभिमानास्पद बाब आहे.

रत्नागिरीतील कलाकारांचा समावेश असलेल्या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. रत्नागिरीतील नाटय़क्षेत्राला आता गती प्राप्त झाली आहे. या ठिकाणी अखिल भारतीय नाटय़ परिषद तसेच युवा कलाकारांचीही नाटय़विषयक चळवळ जोमाने सुरू झाली आहे. येथील कलाकार आता रत्नागिरीपुरतेच स्तिमित न रहाता रत्नागिरीत राहूनही मुंबई, पुण्यातील सिने-नाटय़क्षेत्राशी जोडून घेऊ लागले आहेत. याचबरोबर येथील कलाकारांचा दर्जा ओळखून मुंबई-पुण्याची सिनेसृष्टीही रत्नागिरीशी नाळ जोडू लागली आहे. या ठिकाणी विविध चित्रपटांसाठी ऑडिशन्स होऊ लागल्या आहेत.

राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘दशक्रिया’ हा चित्रपट प्रसिद्ध लेखक बाबा भांड यांच्या ‘दशक्रिया’ या कादंबरीवर आधारित आहे. पैठण येथे केल्या जाणाऱया कर्मकांड विधीवर हा चित्रपट आधारित आहे. याची पटकथा व संवाद ‘जोगवा’ चित्रपट फेम संजय कृष्णाजी पाटील यांचे आहेत. तर दिग्दर्शन संदीप पाटील आणि सिनेमाटोग्राफी महेश आणे यांची आहे. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारासाठी एकूण 6 नॉमिनेशन्स होती. त्यातील या चित्रपटाला ‘बेस्ट मराठी फिल्म, बेस्ट पटकथा आणि संवाद संजय पाटील आणि उत्कृष्ट सहाय्यक अभिनेता मनोज जोशी हे 3 पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

चित्रपटात दिग्गजांच्या भूमिका

या चित्रपटात प्रसिद्ध अ†िभनेते दिलीप प्रभावळकर, मनोज जोशी, आशा शेलार, आदिती देशपांडे, मिलिंद शिंदे, मिलिंद फाटक, संतोष मयेकर, किशोर चौगुले या दिग्गज कलाकारांच्या भूमिका आहेत. तसेच चित्रपटातील प्रमुख व्यक्तिरेखांपैकी एक असलेली हणमंत भट ही व्यक्तिरेखा रत्नागिरीतील रंगकर्मी तसेच प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक प्रफुल्ल घाग यांनी साकारली आहे. या चित्रपटाचे 35 दिवसांचे चित्रिकरण कोल्हापूर-गारगोटी येथे पार पडले. यामध्ये 13 दिवसांचे चित्रिकरण प्रफुल्ल घाग यांचे होते. तसेच रत्नागिरीतील ज्येष्ठ रंगकर्मी शेखर जोशी, त्यांच्या सौभाग्यवती सौ. कल्पना जोशी, तसेच अभिनेत्री पद्मजा खटावकर यांच्याही व्यक्तिरेखा आहेत.

ऑडिशनमधून चौघांची निवड

चित्रपटाच्या ऑडिशनपासूनचा प्रवास अभिनेते प्रफुल्ल घाग यांनी ‘तरूण भारत’जवळ उलगडला. त्यांनी सांगितले की, मुंबईतील अभिजित झुंजारराव यांच्यामार्फत रत्नागिरीतील नाटय़लेखक अनिल दांडेकर यांच्याकडे ऑडिशनविषयी कोणी असल्यास पाठवण्याचे आवाहन आले. त्यानुसार रत्नागिरीतील काही कलाकार कोल्हापूर येथे ऑडिशनसाठी गेले. ऑडिशनमधून रत्नागिरीतील या चार कलाकरांची निवड करण्यात आली.

 घाग यांनी ऑडिशनमध्ये योग्य चुणूक त्यांनी दाखवून दिली होती. मात्र मुख्यत्त्वे मुंबई-पुण्यातील कलाकारांना प्राधान्य दिल्यानंतर घाग यांना आधी एक छोटीशी व्यक्तिरेखा देण्यात आली होती. मात्र या चित्रपटातील हणमंत भट ही भूमिका साकारणाऱया मुंबईतील एका कलावंताची काही समस्या निर्माण झाली. त्यामुळे चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडणाऱया सुमारे 12-13 सिन असलेल्या या व्यक्तिरेखेसाठी घाग यांची निवड करण्यात आली.

रत्नागिरीतील नाटय़क्षेत्रातून सर्व कलाकारांचे अ†िभनंदन

घाग यांनी आतापर्यंत 7 चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत. घाग यांनी ऑस्करपर्यंत जाणाऱया ‘हरिश्चंद्राची पॅक्टरी’ या चित्रपटात छोटीशी भूमिका साकारली होती. हा त्यांचा पहिला चित्रपट, तर प्रसिद्ध अभिनेता अंकुश चौधरीची प्रमुख भूमिका असलेला चित्रपट नुकताच चित्रीत झाला आहे. त्यामध्ये घाग यांनी प्रमुख अभिनेत्रीच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. लवकरच त्यांचा हा चित्रपट येत्या 4 महिन्यात सिनेमागृहात लागणार आहे. तसेच शेखर जोशी, सौ. कल्पना जोशी यांनी रत्नागिरीतील हौशी रंगमंचावर अनेक नाटकांतून दर्जात्मक भूमिका साकारल्या आहेत. तर पद्मजा खटावकर यांनीही विविध चित्रपटांतून भूमिका साकारल्या आहेत. रत्नागिरीतील या कलाकारांनी आता आपल्या अभिनयाने राष्ट्रीय पुरस्कारावर ठसा उमटवला आहे. त्यामुळे रत्नागिरीतील नाटय़क्षेत्रातून या सर्व कलाकारांचे अ†िभनंदन करण्यात येत आहे.

पान 1 ला चौकट घेणे

अतिव आनंद झाला: प्रफुल्ल घाग

राष्ट्रीय पारितोषिक प्राप्त चित्रपटात आपली भूमिका असणे ही निश्चितच माझ्यासह रत्नागिरीतील माझ्या सहकारी कलाकारांसाठी महत्वपूर्ण गोष्ट आहे. आम्ही भूमिका साकारलेल्या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने मला अतिव आनंद झाला आहे. या चित्रपटाने पुणे फिल्म फेस्टिव्हलमध्येही आपला ठसा उमटवत उत्कृष्ट दिग्दर्शक व उत्कृष्ट बालकलाकारावर आपली मोहोर उमटवली होती.

 

Related posts: