|Saturday, October 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » वाळपई पालिका क्षेत्रातील कचऱयाबाबत शासनाचे कडक धोरण

वाळपई पालिका क्षेत्रातील कचऱयाबाबत शासनाचे कडक धोरण 

प्रतिनिधी/ वाळपई

वाळपई पालिका क्षेत्रात निर्माण होणारा कचरा यासंबंधी अनेकवार विनंती करूनही कोणताही परिणाम होत नाही. या पार्श्वभूमीवर पालिका मंडळाने यासाठी कडक धोरण अवलंबविण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. खासकरून शहरी बाजाराच्या मंगळवार दिनी पालिका क्षेत्रात निर्माण होणाऱया कचऱयावर कर गोळा करण्याचा विचार सध्या पालिका मंडळ गांभीर्याने करीत आहे व याची अंमलबजावणी लवकरच करण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. यामुळे पालिकेच्या या निर्णयाने वाळपई शहरात निर्माण होणाऱया कचऱयावर मोठय़ा प्रमाणात आळा बसणार आहे.

वाळपई शहर सर्वात सुंदर, नितळ करण्याची हाक अनेकवार पालिकेने, माजी आमदार विश्वजित राणे यांनी दिली मात्र यास मोठासा प्रतिसाद लाभलेला नाही. खासकरून आठवडा बाजार मंगळवारी विविध स्वरुपाच्या विक्रेत्यांकडून मोठय़ा प्रमाणात निर्माण होणारा कचरा हा मोठी समस्या आहे. बाजार भरणाऱया रस्त्यावर हा कचरा मोठय़ा प्रमाणात निर्माण झालेला असतो. हा कचरा गोळा करण्यासाठी पालिका आपल्या कामगारांचा वापर करून बुधवारी सदर भाग साफ करण्यासाठी प्राधान्य देत असते. आजही अशाच स्वरुपाची विदारक परिस्थिती निर्माण झालेली पाहायला मिळाली आहे. सकाळपासून वाळपई पालिकेच्या कामगारांनी कचरा साफ करण्यासाठी महत्त्वाचे योगदान दिले होते. जवळपास एक दिवस यासाठी खर्च करावा लागतो. ही समस्या दूर करण्यासाठी वाळपई पालिकेने बाजाराच्या दिवशी ठिकठिकाणी कचरापेटय़ा ठेवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

सध्या पालिकेने कचरा कमी करण्यासाठी कचरा कर लावण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. यामुळे कचऱयाची निर्मिती कमी प्रमाणात होणार आहे, असे पालिका मंडळाला वाटत आहे. यासंबंधी नुकत्याच संपन्न झालेल्या पालिका मंडळाच्या बैठकीत महत्त्वाची चर्चा झाली आहे.

वाळपईचे नगराध्यक्ष रामदास शिरोडकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी यासंबंधी पालिका गांभीर्याने विचार करीत आहे, असे स्पष्ट केले. मंगळवारी बाजारदिनी मोठय़ा प्रमाणात कचरा निर्माण होत आहे.