|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » विनोदी नाटकांमध्ये ‘टायमिंग’ महत्वाचे

विनोदी नाटकांमध्ये ‘टायमिंग’ महत्वाचे 

प्रतिनिधी/ पणजी

आपण प्रामुख्याने विनोदी नाटके जास्त केलेली आहेत. विनोदी नाटकांमध्ये ‘टायमिंग’ महत्वाचे असल्याने त्याची जाण असणे फार महत्वाचे असते. नाटकाचे प्रयोग सुरू असतानाही नाटकामध्ये बरेच बदल होत असतात. एखाद्या नाटकाचे कुठलेही दोन प्रयोग एकसारखेच होत नाहीत. प्रत्येक प्रयोग वेगळा असतो, असे मत मराठी रंगभूमीवरील प्रख्यात विनोदी अभिनेते प्रशांत दामले यांनी काल रविवारी दैनिक ‘तरूण भारत’ला दिलेल्या भेटीदरम्यान बोलताना व्यक्त केले.

‘गेला माधव कुणीकडे’, ‘एका लग्नाची गोष्ट’, ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’, ‘टूरटूर’, ‘मोरूची मावशी’ यासारखी धमाल विनोदी मराठी नाटके आपल्या विनोदी अभिनयाने गाजविणारे आणि मराठी रंगभूमीवर गेली 30 हून जास्त वर्षांच्या काळात आपल्या विनोदी अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणारे अभिनेते प्रशांत दामले यांनी काल ‘तरूण भारत’च्या पणजी कार्यालयाला भेट दिली आणि सगळे वातावरण काही क्षणांसाठी ‘प्रशांतमय’ झाले. या भेटीमध्ये दामले यांनी नाटकाच्या निर्मितीची प्रक्रिया, विनोदी नाटकामध्ये महत्वाचे असणारे विनोदाचे टायमिंग, नाटकाच्या इंडस्ट्रीमध्ये वावरणारी माणसे, गोव्यातील प्रेक्षक, नाटय़प्रशिक्षण, नाटकाकडे व्यवसाय म्हणून बघण्याचा दृष्टीकोन याच्यासह बऱयाच विषयांवर दिलखुलासपणे चर्चा केली.

एकमेकांना सांभाळून घेण्याची वृत्ती हवी

आपल्या समोरच्या अभिनेत्याला उघडे पाडणे नव्हे, तर त्याला सांभाळून घेणे दुसऱया नटासाठी आवश्यक असते. कारण त्यामुळे नाटक वाचविता येऊ शकते किंवा प्रसंग निभावून नेता येऊ शकतो, असे दामले यांनी सांगितले. नाटकाचा प्रयोग सुरू असताना काहीवेळा असे घडू शकते की एखाद्या संवादामध्ये किंवा प्रसंगावेळी नट स्वतः काहीतरी भर घालतो व प्रेक्षक तो संवाद किंवा प्रतिक्रिया उचलून धरतो. आपल्या नाटकाच्या प्रयोगांच्यावेळी असे अनेक वेळा घडले असल्याचे दामले यांनी प्रांजळपणे सांगितले. ‘गेला माधव कुणीकडे’ या गाजलेल्या नाटकामध्ये असलेला दामले यांचा ‘हाय काय, नाय काय’ हा संवाद मूळ नाटय़संहितेमध्ये नव्हता, तर 99 व्या की 100 व्या प्रयोगाला आपल्या तोंडून संवाद म्हणताना आपल्याला तो सापडला, असे दामले म्हणाले. पुढे तो एवढा लोकप्रिय बनला की नाटकाचा एक भागच बनून गेला. वृत्तपत्रांमध्येही अनेक प्रसंगी त्याचा वापर झाला, असेही त्यांनी सांगितले.

एकाच नाटकाचे अनेक प्रयोग करताना कंटाळा येत नाही का? या प्रश्नावर बोलताना दामले म्हणाले की प्रेक्षकांसाठी नाटक सुरू असताना आम्हा कलाकारांचेही नाटक रंगमंचावर सुरू असते, जे प्रेक्षकांच्या लक्षात येत नाही. प्रत्येक प्रयोगात काहीतरी नाविन्य आणणारा बदल होत असतो. असे रंगमंचावर बऱयाचवेळा एका विशिष्ट क्षणालाच घडते, ज्यामुळे रंगमंचावरील नटही नेहमी सजग व सावध असतात. नाटकाच्या इंडस्ट्रीमध्ये काम करणारे जुने जाणते दिग्दर्शक नवख्या नटांना बघून त्यांना हेरून ठेवतात. भविष्यात त्या नटाला योग्य बसणारी भूमिका त्यांना सापडली किंवा भूमिकेसाठी एखादा नट चपखल बसू शकतो, असे त्यांच्या लक्षात आले तर त्या नटाशी संपर्क साधतात. या व्यवसायामध्ये संयम ठेवणे फार महत्वाचे आणि आवश्यक असते, असे दामले म्हणाले.

हिंदी सिनेमातली काम करण्याची पध्दत रूचली नाही

नाटकात काम केल्यानंतर हिंदी व मराठी सिनेमांमध्येही कामे केली पण पुन्हा नाटकांकडे आपण वळलो असे दामले यांनी सांगितले. साधारणतः अभिनेते नाटकांपासून सुरूवात करून नंतर मराठी व नंतर हिंदी सिनेमांकडे वळतात. हिंदी व मराठी चित्रपट करताना अचानक पुन्हा नाटकांकडे का वळलात? या प्रश्नावर बोलताना दामले म्हणाले की मराठी नाटकांमध्ये काम करताना तीन तास सलग काम करण्याची सवय होती. पण हिंदी चित्रपटाच्या शूटींगची शिफ्ट 12 तासांची. त्यामध्ये केवळ 2 दृश्यांचे चित्रीकरण होणार, हा प्रकार भरभरा प्रयोग संपवून निघणाऱया आपल्यासारख्या नटाला रूचला नाही. त्याशिवाय प्रमुख भूमिका मिळण्याची शक्यता नसल्यानेही हिंदी चित्रपटात काम करण्याविषयी फारसा गांभिर्याने विचार केला नसल्याचेही दामले यांनी सांगितले.

नटाने कोरी पाटी घेऊन बसायचे

आपण अनेक दिग्दर्शकांबरोबर काम केलेले असल्याचे सांगितल्यावर एवढय़ा दिग्दर्शकाबरोबर काम करताना अहंपणाची समस्या आली नाही का? या प्रश्नाविषयी बोलताना दामले म्हणाले की अभिनेत्यांनी अथवा नटांनी दिग्दर्शकांच्यासमोर कोरी पाटी घेऊन बसायचे असते, किंवा ‘आपल्याला काहीही कळत नाही, तुम्ही शिकवा’ अशा आविर्भावाने बसल्यास तसा प्रश्न निर्माण होत नाही.

प्रतिसाद चांगला असल्यास नटांनाही हुरूप येतो

प्रेक्षकांचा प्रतिसाद चांगला असल्यास नाटक करणाऱया नटांनाही हुरूप येतो. त्यांचा उत्साह वाढतो. विनोदी नाटक असले व प्रेक्षक हसले नाही, तर नटांची प्रचंड दमछाक होते कारण जेव्हा विनोदावर प्रेक्षक हसतात, तो आमच्यासाठी श्वास घ्यायचा क्षण असतो असे त्यांनी सांगितले. 

नवशिक्या नटांना कमीपणा व जमेच्या बाजू सांगतो 

आपल्या पुणे येथे असलेल्या नाटय़प्रशिक्षण अकादमीमध्ये आपण अभिनय, गाणे व नृत्य शिकवितो. त्याप्रमाणे त्यांच्यामध्ये काय कमी आहे व काय जमेच्या बाजू आहेत ते त्यांच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करतो. आपल्या कमीपणाच्या बाजू झाकून ठेवून जमेच्या बाजू दाखविणे एखाद्या नटासाठी महत्वाचे असते व आपण तेच शिकवितो असे दामले यांनी सांगितले.

 गोव्यामध्येही व्यवसायिक स्तरावर मराठी नाटके झाली पाहिजेत. प्रत्येकवेळी सरकारकडून मिळणाऱया अनुदानावरच अवलंबून न राहता स्वतःचेही पैसे खर्च करून नाटके केली जावीत असे त्यांनी सांगितले. जोपर्यंत स्वतःच्या खिशातले पैसे खर्च होत नाहीत, तोपर्यंत माणूस आग लागल्यासारखे काम करीत नाही, असे त्यांनी याविषयी बोलताना सांगितले.

 यावेळी दैनिक ‘तरूण भारत’चे गोवा आवृत्ती प्रमुख विजय पाटील, जनसंपर्क अधिकारी मंगेश काळे, पणजी प्रतिनिधी शैलेश तिवरेकर, सनतकुमार फडते, समीर नाईक, छायाचित्रकार उमेश बाणस्तारकर यांच्यासह संपादकीय, जाहिरात विभाग आणि इतर कर्मचारीवर्ग उपस्थित होता.  

Related posts: