|Monday, January 20, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » रेल्वे रुळ ओलांडणे धोकादायक

रेल्वे रुळ ओलांडणे धोकादायक 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

रेल्वे रुळ ओलांडत असताना रेल्वेखाली सापडून अनेक अपघात झाले आहेत. या अपघतात काहींना प्राण गमवावा लागला आहे तर काहींना अपंगत्व आले आहे. तरीही रेल्वे ओलांडणे थांबत नाही. मध्यवर्ती बसस्थानकाकडून राजारामपुरीकडे किंवा राजारामपुरीतून बसस्थानकाकडे जाण्यासाठी रेल्वे रुळाचाच वापर करावा लागतो. रुळ ओलांडताना होणारे अपघात थांबायचे असतील तर शाहुपुरी रेल्वे फाटक आणि मार्केट यार्ड येथे पादचारी पूल तातडीने होणे आवश्यक आहे.

मध्यवर्ती बसस्थानकाकडून राजारामपुरीत जाण्यासाठी किंवा राजारामपुरीतून बसस्थानकाकडे जाण्यासाठी सद्या परीख पूलाखालील रस्ता हा एकमेव मार्ग आहे. पण मुळात हा रस्ताच अरुंद आहे. या पुलाखालून पादचारी रहदारी करु शकत नाहीत. यामुळे रेल्वे ओलांडूनच पादचाऱयांना रहदारी करावी लागते. परिणामी रेल्वेखाली सापडून अपघात होतात. सोमवारी सीपीआरमधील सुरक्षारक्षकाचा झालेला  अपघात त्यातीलच एक आहे.

शाहुपुरी, राजारामपुरीतून मध्यवर्ती बसस्थानकाकडे जाण्यासाठी पादचारी पूल बांधण्याची जबाबदारी महापालिकेची असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱयांकडून सांगितले जाते. तर शाहुपुरी  रेल्वे फाटक येथील पादचारी पूलासाठी महापालिकेने 31 लाख रुपये रेल्वे प्रशासनाकडे भरले आहेत. महापालिका आणि रेल्वेच्या वादात हा पादचारी पूल अडकला असून नागरिकांचा नाहक बळी जात आहे. सर्वसामान्यांच्या सुरक्षिततेशी या दोन्ही यंत्रणांना देणेघेणे नाही. प्रशासनाच्या या लाल फितीच्या कारभाराबद्दल सर्वसामान्यांतून संताप व्यक्त केला जात आहे.

हीच अवस्था मार्केट यार्ड येथील पादचारी पूलाची आहे. या ठिकाणी पादचारी पूलाच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. पण गेल्या काही महिन्यापासून या पूलाचे काम रखडले आहे. अत्याधुनिक मशीनरी उपलब्ध होत नसल्यामुळे काम थांबल्याचे यापूर्वी सांगण्यात आले होते. मात्र ही मशीनरी उपलब्ध कधी होणार आणि काम कधी पूर्ण होणार असा प्रश्न नागरिकांतून विचारला जात आहे. विक्रमनगर, टेंबलाईवाडीतून मार्केट यार्डात जाणाऱयांची संख्या मोठी आहे. तसेच शालेय विद्यार्थीही जातात. या सर्वांचे रहदारी येथील रेल्वे रुळावरुनच सुरु आहे. पण अपघात झाल्यास कोण जबाबदार असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. मुळात रेल्वे रुळ ओलांडणे धोकादायक आहे, पण रुळांवरुन लोकांनी रहदारी करु नये यासाठी त्यांना सुरक्षित मार्ग उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणांची आहे.

 

Related posts: