|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » बारावीतील विद्यार्थिनीची रेल्वेखाली आत्महत्या

बारावीतील विद्यार्थिनीची रेल्वेखाली आत्महत्या 

कुडाळ : तालुक्यातील पिंगुळी-राऊळवाडी येथील रहिवासी व येथील कुडाळ हायस्कूल-ज्युनिअर कॉलेजची बारावीची विद्यार्थिनी गीता गणेश शेटकर (18) हिने रेल्वेखाली आत्महत्या केली. ही घटना तिच्या घरापासून साधारण 100 मीटर अंतरावर घडली. तिने बारावीची परीक्षा दिली होती. अभ्यासातही ती हुशार होती. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या घटनेने पिंगुळी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

गीता कुडाळ हायस्कूल-ज्युनिअर कॉलेजमध्ये वाणिज्य शाखेत शिकत होती. बारावीची परीक्षाही तिने दिली होती. काहीच दिवसांत परीक्षेचा निकाल लागणार आहे. तिचे वडील गणेश (दादा) शेटकर पिंगुळी ग्रामपंचायतीत चतुर्थश्रेणी कर्मचारी म्हणून कामाला आहेत. शनिवारी सकाळी 6.30 वाजता ते नेहमीप्रमाणे ग्रामपंचायतीचे कचरा वाहन घेऊन घरातून बाहेर पडले, तेव्हा ती घरात झोपली होती. नंतर काही वेळातच ती तिच्या घरामागील मुख्य रस्ता ओलांडत असताना एका रिक्षा चालकाला दिसली. 7.30 वाजण्याच्या सुमारास दशरथ राऊळ मॉर्निंग वॉकसाठी रस्त्याने जात असताना तेथील ग्रामपंचायत इमारती समोरील ट्रकवर त्यांना काही संशयास्पद दिसले. त्यांनी तेव्हा ग्रामस्थांना बोलावून घटनास्थळी जाऊन शहानिशा करताच तो गीताचा मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले.

तिने गोव्याहून मुंबईकडे सकाळी 6.45 वाजण्याच्या सुमारास जाणाऱया रेल्वेखाली आत्महत्या केली असावी, अशी शक्यता आहे. तिचा मृतदेह छिन्नविच्छीन्न झाला होता. कुडाळचे पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण गवस यांनी घटनास्थळी भेट दिली. हवालदार पी. जी. मोरे व प्रशांत कासार यांनी पंचनामा केला. विकास कुडाळकर, संजय परब, मिलिंद परब व ग्रामस्थांनी सहकार्य केले. 00

पिंगुळी गाव पणदूर प्राथमिक आरोग्य केंदांतर्गत येतो. पण त्या केंद्राचे डॉक्टर उपलब्ध नव्हते. कुडाळकर यांच्या सांगण्यानुसार येथील ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. गौरव घुर्ये यांनी घटनास्थळी जाऊन विच्छेदन करून सहकार्य केले.

गीता अभ्यासात फार हुशार होती. तिने दहावीत नव्वद टक्के गुण मिळविले होते. बारावीतही चांगले गुण मिळतील, याची खात्री होती. तिच्या पश्चात वडील, आई व बहीण असा परिवार आहे.

Related posts: