|Sunday, March 29, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » लढू आणि जिंकूचा इशारा

लढू आणि जिंकूचा इशारा 

महाराष्ट्रात खरिपाच्या पेरणीची आणि वैष्णवांच्या पंढरी वारीची लगबग सुरु आहे. तर तिकडे यमुनेकाठी राष्ट्रपती कोण याचे वेध ‘राजकारण्यांना’ लागले आहेत. जो तो ज्याच्या त्याच्या मतीने नाव सुचवत असतो आणि रेटतही असतो. पण, राष्ट्रपतीपदाचा  भाजपाचा उमेदवार ठरलेला नाही आणि ‘नागपूर’ मधून कोणत्याही नावाचे सूतोवाच नाही. ओघानेच अनेक नावांची चर्चा, तर्क आणि नाना अंदाज बांधून सोशल मिडीया व अन्य माध्यमातून चर्चा सुरु आहेत. सुपरस्टार अमिताभ बच्चनपासून उद्योगपती रतन टाटा पर्यंत शरद पवारांपासून राम नाईक, सुमित्रा महाजनपर्यंत आणि सरसंघचालक मोहन भागवतांपासून कृषीतज्ञ स्वामीनाथनांपर्यंत अनेक नावे पुढे येत आहेत. शिवसेनेने प्रथम मोहन भागवतांचे नाव सुचवले व भागवतांनी याला नाकार देताच स्वामीनाथन यांचे नाव पुढे केले. भाजपच्या आदिवासी समाजासाठी काम करणाऱया व झारखंडच्या राज्यपाल द्रोपदी मूर्म यांच्या नावाचीही चर्चा आहे. काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यामुळे सर्वसंमतीचा सर्व पक्षीय उमेदवारही पुढे येऊ शकतो. पण, त्यासाठी एकमत होण्याची गरज आहे. राष्ट्रपतीपद महिलेला द्यावे, मागासवर्गीयांना द्यावे, आदिवासी समाजातील कार्यकर्त्यांना द्यावे, शास्त्रज्ञांना द्यावे की ज्येष्ठ राजकारण्याला, कलाकाराला द्यावे या संदर्भानेही विविध मतप्रवाह आहेत. भारत हा सव्वाशे कोटींचा देश आहे. येथे गुणवत्तेची व विविध क्षेत्रात आपली मुद्रा उमटवलेल्या व्यक्तिंची कमतरता नाही. इन्फोसेसचे नारायण मूर्ती, संगणकात महाकामगिरी करणारे विजय भटकर, अनेक विद्वान, व्यासंगी आहेत.पण, अजून कुणाच्या नावाची निवड वा अधिकृतता झालेली नाही. सत्तारुढ भाजपाने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उमेदवार निश्चितीसाठी सहयोगी पक्ष आणि काँग्रेस आदी विरोधी पक्षांशी चर्चा सुरु केली आहे. व्यंकय्या नायडू, काँग्रेस नेत्या सोनिया गांधींशी या विषयावर संवाद करत आहेत तर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा शिवसेनेशी, उद्धव ठाकरेंशी बोलायला महाराष्ट्रात आले आहेत. शिवसेनेचे 63 आमदार, 18 खासदार आहेत. शिवसेना आपला उमेदवार उभा करुन निवडून आणेल अशी स्थिती नाही पण, तिची मते भाजपाला महत्वपूर्ण ठरु शकतात. पण, शिवसेना-भाजपाची महाराष्ट्रातील मोट विळय़ा-भोपळय़ाची आहे. तुझे माझे पटेना तुझ्य़ाशिवाय गमेना असा हा संसार सुरु आहे. एकाच घरात स्वतंत्र झोपणारे नवरा-बायको असे महाराष्ट्रातील सत्तारुढ पक्षाचे वर्णन केले जाते आणि त्यास कारणेही तशीच आहेत ती दडून राहिलेली नाहीत. जेथे जमेल तेथे हे दोन्ही पक्ष एकमेकांचा पाणउतारा करत असतात आणि त्यातूनच महाराष्ट्रात विधानसभेच्या मध्यावधी निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. हे वारे वाहत नाही. त्यासाठी पंखे लावले जात आहेत अशीही टिप्पणी ऐकू येत आहे. या साऱयामागे सत्तारुढ भाजपाचे दबावतंत्र आहे. भाजपाला विधीमंडळात पूर्ण बहुमत हवे आहे आणि भाजपाला कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेच्या नाकदुऱया काढायच्या नाहीत. शेतकरी कर्जमुक्ती आंदोलन असो अथवा मुंबई महापालिका निवडणूक असो शिवसेना मंत्री खिशात राजीनामे ठेऊन, सत्तेची मेजवानी झोडत भाजपाला दुषणे देतात यामुळे भाजपा वैतागला आहे. होऊन जाऊ दे आरपार असा काहींचा रेटा आहे तर काहींना वाटते मध्यावधीचे नाव काढताच सेना फुटेल आणि भाजपाचा जादुई आकडा प्राप्त होईल. खरे तर राज्यात मान्सूनला प्रारंभ झाला आहे. कर्जमुक्तीची घोषणा झाली आहे आणि दहा हजार पर्यंत खरीप मदत सरकार करणार असे सांगितले जात आहे. रानात कुऱया सुरु झाल्या पण, यातले प्रत्यक्षात काही झालेले नाही. घोषणांच्या फैरी सुरु आहेत. इशाऱयांवर इशारे दिले जात आहेत. राजकारणी आणि सरकार सत्तेच्या सारीपटावर चाली करण्यात गुंग आहे आणि विरोधी पक्षही त्याच पावलावर पाऊल टाकून वाटचाल करतो आहे. विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन तोंडावर आहे. या अधिवेशनात सरकारची कोंडी करण्याची व्यूहरचना विरोधकांनी करायला हवी पण, तेथे सारा उजेडच आहे. उलट शिवसेनेसारखे सत्तासोबती भाजपाला कोंडीत पकडण्याची संधी सोडत नाहीत. या पार्श्वभूमीवर अमित शहा यांचा मुंबई दौरा अनेक अर्थांनी लक्षणीय म्हणावा लागेल. या दौऱयात ते जे पेरणार त्याचे पीक दिवाळीपर्यंत दिसायला लागेल हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नाही. पण, ‘आम्ही लढू आणि जिंकू’ हा त्यांचा इशारा शिवसेनेसह सर्वच पक्षांना आहे. मुंबई महापालिका शिवसेनेच्या ताब्यात आहे. अमित शहा शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांना मातोश्रीवर भेटणार म्हणून मुंबई भाजपाने मातोश्री परिसरात आणि त्या रस्त्यावर त्यांच्या स्वागताचे फलक लावले होते. मुंबई महापालिकेने हे फलक उतरवले. यातून या दोन पक्षाचे प्रेम, सख्य पुन्हा अधोरेखित झाले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी शहा यांच्या दौऱयाच्या पार्श्वभूमिवर अचानक मध्यावधीचा विषय चर्चेत आणला तो सहज म्हणून नव्हे त्यामागे दबावतंत्राचे राजकारण आहे. अमित शहा यांनीही आम्हाला देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली 5 वर्षे हे सरकार चालवायचे आहे. पण, मध्यावधी निवडणुका लागल्याच तर आम्ही लढू. आम्हाला लढावे लागेल आणि आम्ही जिंकू, असे सांगून वेगळय़ा विदर्भापासून शेतकरी कर्जमुक्तीपर्यंत आणि नरेंद्र मोदी सरकारच्या कामगिरीपासून जीएसटीपर्यत अनेक विषयांना स्पर्श केला. भाजपच्या चाणक्यांनी विरोधकांना बेसावध ठेऊन अचानक निवडणुकांचा पट यापूर्वी अनेकवेळा मांडला आहे. फिलगुड असो किंवा नारायण राणेंनी राजीनामा देऊन घेतलेल्या निवडणुका असोत भाजपाची ती परंपरा आहे. कर्जमुक्ती, नोटाबंदी, चांगला मान्सून आणि विरोधक दुर्मुखलेले अशावेळी भाजपाचे चाणक्य काहीही करु शकतात. पण, मध्यावधी निवडणुका होतील असे वाटत नाही. मध्यावधीच्या इशाऱयातून शिवसेनेला सरळ करण्याची राष्ट्रपती निवडणुकीसाठी सेनेला सोबत घेण्याची आणि प्रसंगी शिवसेना फोडण्याची रणनिती असू शकते. लढू व जिंकू याचा तोच अर्थ आहे. शेतकरी आणि अवघा महाराष्ट्र राजकारणातील या सत्तातुरांना कंटाळला आहे. त्याने पेरणीची लगबग सुरु केली आहे आणि वारीतून ‘जय जय रामकृष्ण हरि’चा जप करत वारकरी पंढरीची वाट जवळ करत आहेत.

Related posts: