|Monday, February 17, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » पणजी पोटनिवडणुकीतून अशोक नाईक यांची माघार

पणजी पोटनिवडणुकीतून अशोक नाईक यांची माघार 

प्रतिनिधी/ पणजी

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या विरोधात पणजी मतदारसंघातून विधानसभा पोटनिवडणूक लढवण्यास पणजीचे माजी महापौर अशोक नाईक यांनी नकार दर्शवला असून एकंदरीत निवडणकीतून माघार घेतली आहे. निवडणूक जिंकणार नसेल तर लढवून काही उपयोग नाही असे सांगून त्यांनी शेवटी अंगच काढून घेतले. त्यामुळे काँग्रेस पक्षासह कोणत्याच पक्षाच्या उमेदवारीवर ते निवडणूक लढणार नाहीत हे आता स्पष्ट झाले आहे.

पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत नाईक यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले काँग्रेसच्या उमेदवारीवर पणजीची निवडणूक जिंकणार अशी आशा घेवून पुढे निघालो होतो. परंतु कार्यकर्त्यांनी, समर्थकांनी, हितचिंतकांनी काँग्रेसची उमेदवारी घेऊ नका, असा आग्रह धरला. त्यामुळे माघार घेण्याशिवाय पर्याय राहिला नाही.

निवडणूक जिंकण्यासाठी, हरण्यासाठी नव्हे

काँग्रेसचे प्रभारी चेल्लाकुमार तसेच प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांच्याशी आपण चर्चा केली होती. काँग्रेसची व भाजपची मते घेऊन विजयी होण्याची संधी आहे असे प्रथम वाटले होते. परंतु कार्यकर्ते तयार नाहीत. ते जर तयार नसतील तर निवडणूक लढवण्यात अर्थ नाही व पराभूत होण्यातही अर्थ नाही. जिंकण्यासाठी निवडणूक लढायची आहे. हरण्यासाठी नव्हे असेही श्री. नाईक यांनी नमूद केले.

गेल्या काही वर्षात पणजीचे आमदार व मुख्यमंत्री असूनही मनोहर पर्रीकर यांचे पणजी मतदारसंघाकडे दुर्लक्ष झाले आहे. राजकारणात सुरूवातीची काही वर्षे त्यांनी जोमाने काम केले परंतु नंतर त्यांनी पणजीच्या प्रश्नांकडे फारसे गांभीर्याने लक्ष दिले नाही असे मत नाईक यांनी मांडले.

आपण महापौर असताना आणि त्यानंतरही पणजी शहरातून अनेक कामे केली. कचरा प्रश्न, पार्किंग यावर उपाय काढले. पणजी सुंदर-स्वच्छ रहावी म्हणून मार्केटात उपाय घेतले. पणजी शहरातून डुकरांचा नायनाट केला. आता मात्र मार्केटकडे दुर्लक्ष होत असून सांतईनेज नाल्याचाही प्रश्न सुटला नसल्याने त्यांनी खंत प्रकट केली.

Related posts: