|Tuesday, December 10, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » हरिदास हरला

हरिदास हरला 

आमचा मित्र हरिदास पुरोगामी आहे, असे त्याची बायको म्हणते. ती जरा जुन्या विचारांची आहे, असे तो आमच्यासमोर म्हणतो. हरिदासच्या समोरच्या इमारतीतील सदनिकेत नागजंपी ऊर्फ नाग्या राहतो. दोघांच्या बाल्कनी समोरासमोर आहेत. काल नाग्याची बायको बाल्कनीत उभी राहून वेणी घालत होती. त्याचवेळी हरिदासची बायको ब्युटीपार्लरमधून आली होती आणि लिंबूपाणी पीत बाल्कनीत उभी होती. दोघींनी एकमेकींकडे बघितलं. मग (आपापली) नाके मुरडून त्या आत आल्या. त्याच वेळी हरिदासने टी पॉयवर पडलेलं ब्युटीपार्लरचं बिल पाहिलं. बिलाची रक्कम पाहून तो नम्रपणे म्हणाला,

“अगं, किती हा खर्च. मी आता रिटायर झालो. नोकरीत असतानाची वरकमाई थांबली आहे. घरातल्या घरात वेणीफणी करून तू एखादी टाल्कम पावडर का नाही वापरीत? पार्लरवरचा खर्च टाळला तर ते पैसे आपण विकासासाठी वापरू शकू.’’

“माझंच मेलीचं नशीब फुटकं… माझा नवरा पुरोगामी. तुम्हाला फक्त माझा मेकअप दिसतो. केव्हातरी सणाच्या निमित्ताने करते नं मी? समोरच्या नागजंपी वहिनी बघा, रोज पाच वेळा वेणी घालतात, पावडर लावतात, काजळ… आधी त्यांना सांगा. मग मला बोला.’’

“त्यांना मी कसं सांगू? त्यांना नाग्या सांगील की.’’

“आधी त्यांना सांगा. त्या रोज पाचपाच वेळा करतात. मी फक्त सणासुदीला करते.’’

“पण आपले सण किती असतात… श्रावण महिन्यात हे एवढे सण, पुढे बारा दिवस गणपती, गौरी, आता नवरात्र, पुढे दिवाळी… तू प्रत्येक सणाला रोज पार्लरमध्ये जातेस.’’

तेवढय़ात हरिदासला वेगळा विषय आठवला –

“आणि हो, तुझ्या चेन्नई बहिणीचा मेसेज आला होता. तिचं मिस्टरांशी भांडण झालंय. ती येणारे. मी तिला मेसेज केला की ये, आपलंच घर आहे.’’

“माझी चेन्नईची ताई म्हटल्यावर लगेच पाघळून तुम्ही वा इंगे म्हणालात. अहा रे तुमचा मानवतावाद.’’

“मी वा इंगे म्हटल्यावर तुला रोहिंगे लोकांचा प्रश्न आठवला का? तुझी ताई काही निर्वासित नाही. तिचं मिस्टरांशी तात्पुरतं भांडण झालंय. चार दिवस राहील आणि जाईल.’’

“अजिबात चालणार नाही. मी तुम्हाला चांगली ओळखून आहे. ती आली की तुम्ही तिच्याशी फार लघळपणा करता. मघाशीच तिला मी मेसेज केलाय की आमच्याकडे अजिबात येऊ नकोस.’’

हे ऐकून हरिदास खिन्न झाला.

Related posts: