|Thursday, June 27, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » मुख्यमंत्र्यांनी घेतला ‘आंचिम’ तयारीचा आढावा

मुख्यमंत्र्यांनी घेतला ‘आंचिम’ तयारीचा आढावा 

मुख्य सचिव,पोलीस महानिरीक्षक, जिल्हाधिकारी व अन्य अधिकाऱयांची उपस्थिती

प्रतिनिधी/ पणजी

गोव्यात आजपासून सुरु होत असलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आढावा घेण्यासाठी काल रविवारी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक झाली. मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत आंचिमच्या आयोजनाचा संपूर्ण आढावा घेतला. सुरक्षा व्यवस्थेपासून साधनसुविधा आणि आंचिमस्थळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये याबाबतही या बैठकीत चर्चा झाली.

बैठकीला राज्याचे मुख्यसचिव धर्मेद्र शर्मा, पोलीस महानिरीक्षक, उत्तर गोवा जिल्हाधिकारी नीला मोहनन, पोलीस अधीक्षक चंदन चौधरी, पणजी मनपाचे आयुक्त, पोलीस अधिकारी, साबांखा, वीज, माहिती खात्याचे अधिकारी यांची या बैठकीला उपस्थिती होती.

खड्डे, खोदलेले रस्ते बुजवा

आंचिमची तयारी कशापद्धतीने करण्यात आली आहे, याबाबत मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतले. त्याचबरोबर अनेक महत्त्वपूर्ण सूचना केल्या. साबांखा अधिकाऱयांना वास्कोपासून पणजीपर्यंतच्या रस्त्यावर कुठे खड्डे आहेत, रस्ते खणलेले आहेत याची मुख्यमंत्र्यांनी जाणीव करून दिली. त्याचबरोबर उद्या 20 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत सर्व कामे पूर्ण करा अशी सूचनाही केली.

आंचिमस्थळी आंदोलने होऊ नयेत

आंचिम उद्घाटन सोहळ्याप्रसंगी काही विघातक घटक गोंधळ घालण्याचा प्रयत्न करतात. फलक हातात घेऊन निदर्शने करतात. घोषणा देण्याचा प्रयत्न करतात. त्यावर लक्ष ठेवण्याची सूचना केली. आंदोलन करण्याचा अधिकार कुणालाही आहे. पण ते शांतपणे कुठेतरी बसून केले व विरोध प्रकट केला तर हरकत नाही. पण मुद्दामहून गुपचूपपणे कार्यक्रमात येऊन नंतर काळे झेंडे दाखवून घोषणा दिल्या जातात. त्यामुळे राज्याच्या प्रतिमेवर त्याचा परिणाम होतो. त्यावर लक्ष ठेवण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

पोलिसांच्या भोजनाबाबत लक्ष द्या

सुरक्षा व्यवस्था योग्य प्रकारे तैनात केली जावी. पोलिसांच्या भोजनावर लक्ष देण्याची सूचनाही केली. त्यासाठी अगोदर पोलिसांची बैठक घेऊन त्यांना आवश्यक त्या सूचना करा, असेही त्यांनी पोलीस महानिरीक्षकाना सांगितले. पाण्याची व्यवस्था, वीजपुरवठा याबाबतही त्यांनी अधिकाऱयांशी चर्चा केली.

सुरक्षा व्यवस्थेबाबत सतर्क रहा

विमानतळ, रेल्वेस्थानक, बसस्थानके इथली सुरक्षा व्यवस्थेवर लक्ष देण्याची सूचना त्यांनी केली. काही घटक हे चांगल्या कार्यक्रमाच्यावेळी आणि आंचिमसारख्या आंतरराष्ट्रीय महोत्सवाच्यावेळी हमखास अपशकून करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्यावर लक्ष ठेवण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. सुमारे 40 मिनिटे चाललेल्या या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण महोत्सव आयोजनाचा आढावा घेतला.