|Saturday, February 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » ‘मास्टर माईंड’ राजू दास पोलिसांना शरण

‘मास्टर माईंड’ राजू दास पोलिसांना शरण 

प्रतिनिधी/ म्हापसा

शुक्रवारी काणका-आबासवाडा येथे बँकेवर पडलेल्या दरोडाप्रकरणील मास्टर माईंड राजू तुवी दास (33) हा मूळ बिहारी तथा सध्या काणका येथे राहणारा संशयित रविवारी सायंकाळी म्हापसा पोलिसांना शरण आला. या दरोडय़ात आपलाच हात असल्याचे त्याने मान्यही केले आहे. विशेष म्हणजे दरोडय़ाच्या आदल्या दिवशी म्हणजेच गुरुवारी 7 डिसेंबर रोजी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास त्यांनी काणका येथील इंडियन ओव्हरसीज बँकेत जाऊन रंगीत तालीमही घेतली होती, असे त्याने आपल्या जबानीत म्हटले आहे.

शुक्रवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास सात दरोडेखोरांनी हा दरोडा पूर्वनियोजन करून घातला होता हे आता उघड झाले आहे. दरोडय़ाच्या दिवशी राजू दास रिक्षामधून त्या ठिकाणी उपस्थित होता. दरोडय़ानंतर दरोडेखोरांच्यामागे जमाव मागे लागल्यावर राजूने रिक्षामधून इतरांना घेऊन पळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र दोघेजण जमावाच्या हाती लागल्याने ते काही करू शकले नाहीत. यावेळी त्याने इतर साथीदारांना आपल्या सोबत घेण्याचा प्रयत्न केला. मात्र जमावाने दोघांना पकडल्यानंतर त्यांना तेथेचे सोडून थिवी चर्च येथे वाहन सोडून त्याने रेल्वेमधून केरळच्या दिशेने पलायन केल्याची माहिती उघड झाली होती. अन्य दोघे साथीदार मोटारसायकलवरून पळाले होती. दरोडय़ाची बातमी वाऱयासारखी पसरल्यानंतर सर्व दरोडेखोर वेगवेगळय़ा दिशेने पळाले होते.

काणका येथील बारमालकाची चौकशी होणार

दरोडय़ाच्या दिवशी राजू दास आपल्या रिक्षा पिकअपमधून घटनास्थळी बाजूला होता हे सीसीटीव्हीमधून स्पष्ट झाले आहे. राजू बँकेमध्ये गेला नव्हता, मात्र प्लॅननुसार सर्व संशयित दरोडेखोरांना पैसे लुटल्यानंतर घेऊन पळण्याचा त्याचा बेत होता, अशी माहिती पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर यांनी दिली. राजू व त्याचे अन्य साथीदार दरोडय़ापूर्वी 3 तास आधी तेथीलच सर्कलजवळ असलेल्या बारमध्ये दारू पिण्यासाठी बसले होते. त्यापैकी दोघांनी अतिमद्य प्राशन केले होते. सर्कलजवळील एका बार ऍण्ड रेस्टॉरंट फास्टफूडमध्ये राजू दासचा भाचा कामाला होता. त्याच्याआधारे राजूला पकडण्यास पोलिसांना यश आले. त्या रेस्टॉरंटच्या मालकाला पोलीस जबानीसाठी ताब्यात घेणार आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राजू येथील सर्कलजवळ वळणावरच असलेल्या बारमध्ये गेले चार दिवस दारू पिण्यासाठी येत होता. येथेच बँक लुटण्याचा कट त्याने आखलचे बोलले जात आहे. पोलीस त्या दिशेने तपास करणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

जखमी संशयित विजयकुमार दासच्या प्रकृतीत सुधारणा

दरम्यान, दरोडय़ाच्या दिवशी जमावाने केलेल्या मारहाणीत जखमी झालेल्या विजयकुमार दासच्या प्रकृतीत सुधारणा होत असून सोमवारपर्यंत त्याला डिस्चार्ज देण्यात येईल, अशी माहिती मिळाली आहे. त्यानंतर त्याचीही चौकशी केल्यावर अन्य माहिती उघड होणार आहे. दरोडय़ानंतर चाकूचा धाक दाखवून विजयकुमारने बाहेर धाव घेतली असता जमावाने पाठलाग करून त्याला पकडले होते. यादरम्यान विजयकुमारने जमावावर गोळीबार करण्याचाही प्रयत्न केला, मात्र जमावाने गोळी चूकवून त्याच्यावर दगडाने वार केले. एक दगड त्याच्या डोक्याला लागल्याने तो जमिनीवर कोसळला होता. त्यानंतर जमावाने त्याच्याच हातातील सुऱयाने त्याच्यावर वार करत त्याला जबर जखमी केले होते. रक्तबंबाळ अवस्थेतच पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर यांनी त्याला उपचारासाठी म्हापशातील जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. आता त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे, अशी माहिती काल रविवारी पोलिसांनी दिली.

अन्य दरोडे व चोऱयांची चौकशी करणार

धारगळ येथील एटीएम फोडून झालेली चोरी व राज्यातील अन्य काही चोऱयांमध्ये या गँगचा सहभाग होता काय? या दिशेने पोलीस चौकशी करणार आहेत. राजू दासला आत्ताच अटक झाली आहे. त्याच्या चौकशीनंतर राज्यातील व राज्याबाहेरील अन्य चोऱयांची माहिती त्याच्याकडून मिळण्याची शक्यता आहे, असे निरीक्षक तुषार लोटलीकर यांनी म्हटले आहे.

ती पिकअप राजू दासच्याच नावे

शनिवारी सायंकाळी पोलिसांनी राजू दासने थिवी येथे सोडून दिलेली पिकअप जप्त केली होती. पोलिसांनी चौकशी केली असता ही पिकअप राजू दासच्याच नावे असल्याचे स्पष्ट झाले आहे. राजू दास हा काणका येथील साईबाब मंदिराच्या मागे एका भाडय़ाच्या खोलीत राहत होता. गेल्या 10 वर्षापासून त्याचे काणका वेर्ला येथे वास्तव्य आहे. पर्वरी येथे त्याचे अष्मिरा नावाचे फास्टफूडचे दुकान असून  पर्वरीत हे दुकान प्रसिद्ध आहे. अनेक ग्राहक या फास्टफूडमध्ये गर्दी करतात, अशीही माहिती मिळाली आहे.

मास्टरमाईंडची पर्वरी, काणका, दोडामार्गमध्ये फास्टफूडची दुकाने

राजू दास हा दिसायला साधा सरळ होता. बऱयाचवेळा आपल्या मित्रांसमवेत तो काणकामधील बारमध्ये दारु पिण्यासाठी बसत होता. या दरोडय़ामागचा मास्टरमाईंड हाच आहे हे काणका येथील रहिवाशांना समजल्यानंतर अनेकांनी तोंडात बोटे घातली. दरोडय़ातील त्याच्या सहभागाने येथील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या महितीनुसार राजू दासची पर्वरी, म्हापसा, काणका व दोडामार्ग येथे चायनिज फास्टफूडची दुकाने आहेत. काणका येथील दरोडय़ाचा कट दोडामार्ग येथेच शिजला असावा, असा संशय पोलिसांना आहे.

दरोडय़ात लुटलेली रक्कम बँके आवारातच सापडली

दरोडेखोरांनी दरोडय़ात लुटलेली 11 लाख 86 हजाराची रोकड पोलिसांनी बँकेच्या आवारातच जप्त केली. दरोडेखोर ही रक्कम बँकेच्या एका कोपऱयातच टाकून पळाले होते. दरम्यान, बँक व्यवस्थापक श्वेताब भारती, पंढरीनाथ पोळे व एक ग्राहक असे तिघांचे मोबाईल, दीपक गावकर यांची सोनसाखळी व अजून एका ग्राहकाची अंगठी पोलिसांना अजून सापडली नाही. प्रसंगावधान राखत बँक कर्मचारी लता चिमुलकर यांनी आराडाओरड करून जमाव गोळा केल्यानेच दरोडेखोरांचा प्लॅन फसला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

राजूच्या पत्नीची पोलिसांकडून कसून चौकशी

या दरोडय़ामागे मास्टरमाईंड राजू दासच असल्याचा अंदाज आल्यानंतर पोलीस सतर्क झाले. काणका येथे एका रेस्टॉरंटवर त्याचा भाचा कामाला होता. त्याचे सहकार्य घेऊन पोलिसांनी राजूच्या पत्नीला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्या कुटुंबियांवर दबाव आणला असता राजूच्या पत्नीने त्याला फोन लावल्यावर त्याने आपण केरळ येथेच असल्याचे सांगितले. पोलिसांनी खात्री करण्यासाठी मोबाईल लोकेशन शोधले असता ते केरळ येथेच सापडले. त्यानंतर त्याला नाटय़मयरित्या पुन्हा गोव्यात आणण्यात पोलिसांना यश आले. शेवटी बांबोळी येथे सापळा रचून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले, अशी माहिती प्राप्त झाली आहे.

उर्वरित दरोडेखोर रेल्वेतून मूळ गावी पसार

आतापर्यंत हरिदास, विजयदास व मास्टरमाईंड राजू दास या तिघा संशयितांना पकडण्यात पोलिसांना यश आले. अन्य संशयित शनिवारपर्यंत राजू दासच्या भावासोबत होते, मात्र दरोडाप्रकरण अंगाशी आल्याचे समजताच उर्वरित सर्व संशयितांनी बिहार येथील आपल्या मूळ गावी पलायन केल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली आहे. गावात पोहोचायला त्यांना चाळीस तास लागतात. ऐव्हाना ते गावी पोहोचलेही असतील, अशी माहिती मुख्य संशयित राजू दास यांनी पोलिसांना दिली.

या दरोडेखोरांना पकडण्यासाठी म्हापसा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली खास पथकातील सुनील रेवोडकर, इर्षाद वारंगी, रुपेश कोरगावकर, नितिन नाईक, प्रँकी वाझ यांनी परिश्रम घेतले. पोलीस अधीक्षक चंदन चौधरी व उपअधीक्षक सेराफिन डायस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर अधिक तपास करत आहेत.

Related posts: