|Friday, February 28, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » युवक आणि वन्यजीव संरक्षण

युवक आणि वन्यजीव संरक्षण 

नववर्षाच्या प्रारंभी महाराष्ट्रातील दोडामार्ग तालुक्यातल्या खाणग्रस्त कळणेच्या शेजारी असलेल्या उगाडे येथे बिबटा रानडुक्करांसाठी लावलेल्या फासात अडकल्यानंतर त्याला तेथेच मृत व्हायला लावून निर्घृणरीत्या जाळण्याची दुर्घटना उघडकीस आलेली आहे. सावंतवाडी वन विभागाचे साहाय्यक वनपाल सुभाष पुराणिक यांनी या मृत बिबटय़ाची चारही पंजांची नखे काढणाऱया मनोज डावरे याला संशयित म्हणून ताब्यात घेतल्यावर त्यांनी आपण बिबटय़ाची ही नखे समीर सावंत याच्या सांगण्यावरून काढल्याचे स्पष्ट केलेले आहे. रानडुक्कर, सांबर, भेकरे, चितळासारख्या जंगली श्वापदांच्या मांसाची चटक लागलेले गोव्यातल्या आणि महाराष्ट्र-कर्नाटकातल्या शहरी भागातले बरेचजण सांगेल ती किंमत मोजून जंगली श्वापदाचे मांस खरेदी करत असल्याने गोव्यात, महाराष्ट्रातील जंगल असलेल्या गावात फासे लावून शिकार करण्याच्या प्रकरणात वाढ झालेली आहे. उगाडे गावात तृणहारी जंगली श्वापदांसाठी लावलेल्या सापळय़ात चक्क बिबटा अडकला. अशीच दुर्घटना गोव्यातल्या फोंडय़ाजवळच्या बोरीत उद्भवली होती. तेव्हा या संदर्भात माहिती मिळताच वन खात्याने कारवाई करून रानडुकराच्या सापळय़ात अडकलेल्या बिबटय़ाची मुक्तता केल्याने त्याला जीवनदान लाभले होते.

परंतु उगाडेत बिबटा सापळय़ात अडकून तो त्यातून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करीत असताना मृत्यूमुखी पडला. त्यानंतर त्याचे मृत कलेवर कुजलेले असताना पंजे छाटून बाजारपेठेत मागणी असलेली बिबटय़ाची नखे निर्घृणपणे काढून त्यांना विकण्यासाठी, हा उपद्व्याप झाला असावा. यापूर्वी तिळारी धरणाच्या परिसरात गव्यारेडय़ांची हत्या करून ते मांस मागणीनुसार गोव्यात विकण्याची प्रकरणे यापूर्वीच उघडकीस आलेली आहेत. उगाडे येथील बिबटय़ाची नखे काढण्याच्या प्रकरणात गुंतलेल्या संशयिताकडे पाहिले असता तो युवा अवस्थेत असल्याचे स्पष्ट होते. यापूर्वी सापाच्या विषाची तस्करी करताना पकडलेली मंडळी तरुणच होती. गोवा, महाराष्ट्र, कर्नाटकाच्या सीमेवरच्या भागात जंगली श्वापदांची शिकार करून त्यांच्या मांसाची विक्री करणारी मंडळी तरुणच आहेत. शिक्षण घेऊन नोकरी मिळण्यापेक्षा स्वयंरोजगार करण्याची मानसिकता त्यांच्यात सहजासहजी निर्माण होत नसल्याने अशी मंडळी गुन्हेगारीच्या कृत्यांबरोबर जंगली श्वापदांची शिकार करून त्यांचे मांस, नखे, शिंगे, कातडी यांची विक्री करून अल्पावधीत भरपूर पैसे कमविण्यासाठी असे उपद्व्याप करत असल्याचे स्पष्ट झालेले आहे. आज 12 जानेवारी हा दिवस भारतभर युवक दिन म्हणून साजरा केला जातो. स्वामी विवेकानंदांनी युवावस्थेत अमेरिका येथील शिकागोच्या धर्म परिषदेत भारतीय धर्म आणि संस्कृतीची विजय पताका फडकवली होती. निद्रिस्त भारतीयांना अज्ञानाच्या अंधारातून जागृत केले होते परंतु स्वातंत्र्य प्राप्तीनंतर इथल्या तरुणामध्ये असलेल्या शिक्षण, कला कौशल्य, प्रतिभा यांना वाव देण्यासाठी नोकरी, उद्योगधंदे मिळविणे सहज शक्य न झाल्याने या तरुणांनी गुन्हेगारीच्या दिशेने लक्ष केंद्रित केले आणि त्यामुळे चंदन आणि हस्तीदंत यांची तस्करी करणाऱया वीरप्पन आणि त्याच्यासारख्या बऱयाच जणांना अशा गैरव्यवहारांची चटक लागली.

फासे, सापळे रचून जंगली श्वापदांची शिकार करून त्यांच्या मांस आणि अन्य अवयवांची विक्री करण्याची प्रकरणे आज वाढत चाललेली आहेत. पूर्वी गावठी बंदुकांचा वापर करून रात्रपाळी करून जंगली श्वापदांची शिकार करण्यात लोकांना रस होता. आता फासे, सापळे किंवा विजेच्या धक्कातंत्राचा वापर करून शिकारीच्या प्रमाणात वाढ होत चालली आहे. विषाची तस्करी असो अथवा फास लावून जंगली श्वापदांच्या शिकारीची प्रकरणे असो, यात युवकांचा समावेश वाढत चाललेला आहे, ही चिंतेची बाब आहे. काहीजण वन्यजीवांच्या मुक्ततेचा आव आणून गोव्यासारख्या राज्यातून भुजंग म्हणजे किंग कोब्रासारख्या जहरी सापाची तस्करी करून पैसे कमावत आहेत, ही धक्कादायक बाब आहे. हिवाळय़ात आपल्या प्रशिक्षित कुत्र्यांच्या साहाय्याने घोरपडीला बिळातून खेचून काढल्यानंतर तिच्या रक्त, मांस, कातडीची तस्करी निर्धोकपणे केली जाते. एकेकाळी वानरमारे, माकडमारे असलेल्यांनी आपला पारंपरिक व्यवसाय त्यागून नव्या उपजीविकेच्या मार्गात लक्ष केंद्रित केलेले आहे परंतु कायद्याने गुन्हा ठरविलेला असतानाही युवा पिढी अशा व्यवसायांकडे वळत आहे, ही चिंतेची बाब आहे. जंगली जनावरांची शिकार करण्यात गुंतलेल्या तरुणांना अशा गुन्हेगारी प्रवृत्ती वाढीस लावणाऱया व्यवसायांतून परावृत्त करण्याची नितांत गरज आहे. हल्लीच पुणे येथे संपन्न झालेल्या पर्यावरणस्नेही साहित्य संमेलनात अध्यक्ष म्हणून बोलताना मारुती चितमपल्ली यांनी रानावनात जिज्ञासू आणि शोधक वृत्तीने फिरल्यावर लेखक, संशोधक घडतील, असे स्पष्ट केलेले आहे. सध्याच्या युवापिढीला पर्यटनासाठी जंगलात फिरायला आवडत असले तरी संशोधनासाठी रानवाटा तुडवण्याची त्यांची तयारी नाही. जंगलात फिरताना नोंदी घेण्याऐवजी ही मंडळी कॅमेरातून छायाचित्रे टिपण्यात आनंद मानतात. प्रयोगशाळा आणि ग्रंथालयात बसून वन्यजीवांचे संशोधन करण्यावर त्यांचा भर आहे, याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली.

आज पर्यावरणाचा स्तर दिवसेंदिवस खालावत असल्याने त्याच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी वावरणाऱया तरुणांची आपल्या राष्ट्राला नितांत गरज आहे. तिळारीच्या खोऱयात पट्टेरी वाघांसंदर्भत गिरीश पंजाबीसारखा तरुण कार्यरत आहे. चिपळूणचा मल्हार इंदुलकर ऊदमांजरे आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासावरती गोवा-कोकणात संशोधनासाठी वावरत आहे. सरडय़ाच्या अस्तित्वासाठी कोल्हापूरचा रमण कुलकर्णी प्रयत्नरत आहे. म्हादई खोऱयातल्या वटवाघळांचा अभ्यास म्हादई संशोधन केंद्रामार्फत बेळगावचा राहुल खानोलकर करीत आहे. तांबडी सुर्लाच्या रगाडो नदीच्या परिसरातल्या जंगलात सरपटणाऱया प्राण्यांचा अभ्यास गोव्यातील रमेश झर्मेकरसारखा तरुण करीत आहे.

आज शाळा, महाविद्यालयातल्या मोबाईलच्या व्यसनात गुरफटलेल्या तरुणांना पर्यावरण शिक्षण आणि जागृतीच्या उपक्रमांत गुंतविण्यासाठी या क्षेत्रात वावरणाऱया तरुण संशोधकांनी, अभ्यासकांनी मोहीम नियोजनबद्ध राबविली तर परिवर्तन होऊन त्यांना नवी दिशा, नवा मार्ग मिळण्याची शक्यता आहे. गोव्यात चांदेल येथील चैतन्य मळीक, नेत्रावळीतील चिन्मय तानशीकरसारख्या तरुणांनी सेंद्रिय शेतीचा स्वीकार करून तरुणांसमोर चांगले आदर्श प्रस्थापित केलेले आहे. आजच्या युवादिनी पर्यावरण, वन्यजीव रक्षणसारख्या अशाच संकल्पांचा स्वीकार करून तरुण आपल्या जीवनाला नवा आयाम मिळवून देऊ शकतात.

Related posts: