|Monday, August 19, 2019
You are here: Home » मनोरंजन » १६ एम. एम. चित्रपट महोत्सवाचा समारोप

१६ एम. एम. चित्रपट महोत्सवाचा समारोप 

चित्रपटाचा इतिहास समजून घेतल्यास भविष्याचा वेध शक्य
पालकमंत्री गिरीष बापट यांचे मत ;आम्ही पुणेकर संस्थेतर्फे आयोजित १६ एम. एम. चित्रपट महोत्सवाचा समारोप

ऑनलाईन टीम / पुणे:

   आपण जेव्हा एखाद्या देशाकडे किंवा समाजाकडे पाहतो. तेव्हा केवळ त्याचा नैसर्गिक भाग पहात नाही. त्या भूभागावर राहणारे लोक त्यांची संस्कृती याचा विचार केला जातो. सध्याच्या पिढीला त्या काळातील चित्रपट कसे बनविले आणि लोकांपर्यंत पोहोचविले असतील याची माहिती होणे आवश्यक आहे. जो आपला इतिहास काय आहे हे जाणून घेईल त्यालाच भविष्याचा वेध घेता येईल, असे मत पालकमंत्री गिरीष बापट यांनी व्यक्त केले.  
   आम्ही पुणेकर संस्थेतर्फे १६ एम. एम. दोन दिवसीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन राष्ट्रीय फिल्म संग्रहालयाच्या आॅडिटोरियमध्ये करण्यात आले होते. या महोत्सवाच्या समारोप प्रसंगी माजी आमदार मोहन जोशी, फिक्कीचे संचालक आशिष कुलकर्णी, हेमंत जाधव, डॉ. राजेंद्र खेडेकर, अ‍ॅड. मिलिंद पवार, अरविंद जडे, अखिल झांजले, मुकुंद ढवळीकर, दिनेश देशपांडे उपस्थित होते. अखिल भारतीय चित्रपट महामंडळ, राष्ट्रीय फिल्म संग्रहालयाच्या सहकार्याने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. 
   गिरीष बापट म्हणाले, स्वातंत्र्योत्तर काळातील अनेक चित्रपट या १६ एम एम च्या पडद्यावर पाहिले. हे चित्रपट एका गावाहून दुस-या गावाला नेणे हे खूप अवघड काम होते. त्याकाळी एस. टी., बैलगाडीतून प्रवास करून हे चित्रपट गावोगावी पोहोचविले जात असत. अशा त्या काळातील कलाकारांचा केलेला हा सन्मान म्हणजे कलाकारांना प्रोत्साहन देणे आहे. ज्या कलाकारांनी आपली कला लोकांसमोर सादर करण्यासाठी आयुष्य वेचले त्यांना योग्य ते मानधन मिळावे, यासाठी सरकार विविध योजना राबवित आहे.
  मोहन जोशी म्हणाले, पुणे हे सांस्कृतिक शहर असून या महोत्सवाने सांस्कृतिक ठेवा जपण्याचे काम केले आहे. सध्याच्या तरुण पिढीला १६ एम. एम. काय आहे हे माहिती नव्हते त्याची माहिती या निमित्ताने अनेकांना मिळाली, असेही त्यांनी सांगितले. लीला गांधी म्हणाल्या, जुन्या काळात काम केलेल्या अनेक कलावंतांची परिस्थिती चांगली नसून त्यांचे मानधन सरकारने वाढवावे. काही कलाकारांना मानधनाची खूप आवश्यकता आहे. गरजू कलावंतांपर्यंत मानधन पोहोचणे महत्त्वाचे आहे. जयमाला इनामदार म्हणाल्या, त्या काळातील कलावंतांनी घेतलेले कष्ट आणि आत्ताचे कष्ट यामध्ये फरक आहे. आजची पिढी भाग्यवान आहे. त्यांच्याकडे नवीन तंत्रज्ञान उपलब्ध आहे. परंतु ज्यांनी कष्टाने या सर्व गोष्टी जतन केल्या त्यांची आठवण सध्याच्या पिढीने ठेवावी. 
    कार्यक्रमात ज्येष्ठ वितरक आण्णा देशपांडे, ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी, अभिनेत्री सुषमा शिरोमणी, अभिनेत्री जयमाला इनामदार, वितरक सज्जन लोहार, सतीश विसाळ, राहुल सगरे यांचा सन्मान करण्यात आला. महोत्सवात तू सुखकर्ता, आई, तांबव्याचा विष्णू बाळ, गुलछडी, बापु बिरु वाटेगावकर आदी चित्रपट दाखविण्यात आले. तसेच काही शाळांमधील विद्यार्थ्यांना संग्रहालयातील जुन्या चित्रपटांच्या रिळ व यंत्रसामग्रीची माहितीही देण्यात आली. सृजन कॉलेज आॅफ डिझाईनचे संतोष रासकर यांनी सूत्रसंचालन केले.