जीएसटीने खाद्यान्न क्षेत्राच्या 1,600 कोटीची बचत

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशात जीएसटी लागू करण्यात आल्याने खाद्यान्न क्षेत्रात प्रतिवर्षी 1,600 कोटी रुपयांची बचत होण्यास मदत होईल. जीएसटी लागू करण्यात आल्याने या क्षेत्रातील कराचे ओझे कमी झाले आहे. केवळ जीएसटीमुळे या क्षेत्राला लाभ झाला असून 18 टक्के असणारा कर घटविण्यात आला आहे. भारतीय अन्न महामंडळासाठी 2018-19 च्या अर्थसंकल्पात निधी देण्याची घोषणा करण्यात आली असून व्याजाचे ओझे कमी करण्यात येईल. महामंडळाकडून दीर्घकालीन रोखे बाजारात आणण्यात येतील असे अन्न प्रक्रिया मंत्री रामविलास पासवान यांनी सांगितले.
शेतमालासाठी दीडपट हमीभाव देण्यात आल्याने महागाई वाढण्याचा प्रश्न उपस्थित करण्यात आला. देशातील 80 कोटी नागरिकांना 2 ते 3 रुपयांत गहू आणि तांदूळ देण्यात आल्याने त्याचा सामान्य व्यक्तीवर कोणताही परिणाम होणार नाही. आपल्या मंत्रालयासाठी 1.96 लाख कोटी रुपयांवरून पुढील आर्थिक वर्षासाठी 2.24 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. अन्नधान्यावरील अनुदान 1,73,323 कोटीवरून चालू आर्थिक वर्षात 1,44,781 कोटी रुपयांवर पोहोचले आहे, असे त्यांनी म्हटले.