|Tuesday, September 17, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » गुजरातमध्ये दलिताच्या आत्महत्येमुळे तणाव

गुजरातमध्ये दलिताच्या आत्महत्येमुळे तणाव 

वृत्तसंस्था /गांधीनगर:

दलित चळवळीचे कार्यकर्ते भानुभाई वानकर यांच्या मृत्युमुळे गुजरातमध्ये दलितांनी आंदोलन हाती घेतले आहे. वानकर यांनी आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हे वृत्त राज्यात पसरल्यानंतर अनेक ठिकाणी दलितांनी मोर्चे काढून जिल्हाधिकाऱयांना निवेदन दिले. काही ठिकाणी जाळपोळ आणि किरकोळ दगडफेकीचे प्रकारही घडले.

अहमदाबाद, गांधीनगर आणि पाटन या शहरांमध्ये दलितांनी एकत्र जमून राज्य शासनाच्या विरोधात घोषणा दिल्या. तसेच मोर्चेही काढले. दलित नेते जिग्नेश मेवानी यांनी अहमदाबाद येथे निषेध मोर्चा काढण्याची योजना आखली होती. तथापि त्यांना मोर्चापूर्वीच पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या काही सहकाऱयांनाही पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडून देण्यात आले.

पाटन जिल्हय़ातील दुधका खेडय़ात वानकर यांनी स्वतःला पेटवून घेऊन आत्महत्या केली. याच जिल्हय़ातील दोन दलित युवकांना सरकारने दिलेल्या जमिनीचे वाटप करण्यात यावे. यासाठी त्यांनी आंदोलन छेडले होते. सरकारने समाधानकारक प्रतिसाद न दिल्याने निराश झालेल्या वानकर यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला असे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र, वानकर यांना धमक्या देण्यात येत असल्याने त्यांना हे टोकाचे पाऊल उचलावे लागले, असे त्यांच्या कुटुंबीयांचे आणि सहकाऱयांचे म्हणणे आहे.