|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » सातबारा संगणकीकरणात जिल्हा पुणे विभागात प्रथम

सातबारा संगणकीकरणात जिल्हा पुणे विभागात प्रथम 

88.34 टक्के काम पूर्ण : महसूलमंत्र्यांचा जिल्हा मात्र पिछाडीवर 

प्रतिनिधी/ सांगली

सातबारा संगणकीकरणात राज्यात 35 व्या स्थानावर असलेल्या सांगली जिह्याने 21 व्या स्थानावर झेप घेतली आहे. तर पुणे विभागात अव्वल स्थान मिळविले आहे. येत्या 19 मार्च पर्यंत संगणकीकरणाचे सर्व काम पूर्ण होईल. महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याहस्ते नागरिकांच्यासाठी ऑनलाईन सातबारा खुले केले जातील अशी ग्वाही जिल्हाधिकारी काळम-पाटील यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात सातबारा संगणकीकरणाचे काम गतीने सुरु आहे. शेकडो तलाठी संगणकीकरणाच्या कामांसाठी दिवस-दिवसभर राबत आहेत. आठ महिन्यापूर्वी जिल्हा सातबारा संगणकीकरणामध्ये चांगलाच पिछाडीवर पडला होता. जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी कार्यभार स्विकारल्यानंतर या कामाला चांगलीच गती निर्माण झाली होती. निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी यांनीही तलाठय़ांची मोट बांधत सातबारा संगणकीकरणाचे काम झपाटय़ाने सुरु केले होते. परिणामी आठ महिन्यापूर्वी राज्यात 35 व्या स्थानावर असलेला जिल्हा 21 व्या स्थानावर पोहचला आहे. अनेक जिह्यांना मागे टाकत जिह्याने सातबारा संगणकीकरणाच्या कामांत चांगलीच भरारी घेतली आहे.

जिल्हा पुणे विभागात पहिला

पुणे विभागतील कोल्हापूर, सातारा, सोलापूर सह पुण्याला मागे टाकत जिह्याने अव्वल स्थान पटकाविले आहे. जिह्यात सातबारा संगणकीकरणाचे काम 88.34 टक्के इतके झाले आहे. त्यापाठोपाठ सोलापूर 85.51, पुणे 47, सातारा 34 तर   महसूलमंत्री चंदकांतदादा पाटील यांच्या कोल्हापूर जिह्यात अवघे 15 टक्के काम पूर्ण झाले आहे. सांगली जिह्यातील सातबारा संगणकीकरणाचे काम येत्या 19 मार्च पूर्ण करु. त्यानंतर महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते नागरिकांच्यासाठी ऑनलाईन सातबारा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी काळम-पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले.