|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » जाऊं वृंदावना सकळीक

जाऊं वृंदावना सकळीक 

गोकुळात एका पाठोपाठ एक अशा घडलेल्या प्रसंगांचा गोकुळातील लोक विचार करू लागले. नामदेवराय वर्णन करतात-

गोकुळीं अनर्थ होताती बहुत । मिळोनी समस्त विचारिती ।। वृद्ध ते म्हणती येतें आमुच्या मना। जाऊं वृंदावना सकळीक ।। समस्तां मानला तयांचा विचार । निघती नारीनर शीघ्र तेव्हां ।। अहिर्निशीं देवा करिती जतन । नामा म्हणे मन गोविंदा पैं ।।

नंदादी वृद्ध गोपांनी गोकुळामध्ये मोठमोठी संकटे येऊ लागली आहेत, असे पाहून सर्वांनी एकत्र येऊन यापुढे काय केले पाहिजे, याविषयी विचारविनिमय सुरू केला. त्यापैकी उपनंद नावाचा वयाने व ज्ञानाने मोठा एक गोप होता. तो देश, काल व परिस्थिती यांचे रहस्य जाणणारा असून राम कृष्णांचे कल्याण इच्छिणारा होता. तो म्हणाला-सध्या येथे मोठमोठी संकटे येऊ लागली आहेत. ती मुख्यतः लहान मुलांच्या नाशाला कारणीभूत ठरणारी आहेत.

म्हणून, गोकुळ आणि गोकुळवासी यांचे कल्याण इच्छिणारे आपण या सर्वांनी इथून दुसरीकडे गेले पाहिजे. पहा! मुलांना मारणाऱया राक्षसीच्या तडाख्यातून आपला कान्हा कसाबसा वाचला. त्यानंतर भगवंताच्या कृपेनेच याच्यावर हा मोठा छकडा पडला नाही. वादळरूपी दैत्याने याला आकाशात नेऊन घोर संकटातच टाकले होते. तेथून पुन्हा हा दगडावर आपटला, तेव्हासुद्धा देवाने याला वाचवले. हे अर्जुनवृक्ष पडले तेव्हा हा येथेच होता, पण देवाच्या कृपेनेच पडणाऱया झाडांखाली आला नाही. म्हणून जोपर्यंत एखादे फार मोठे अनिष्टकारक संकट या व्रजाला नष्ट करीत नाही, तोपर्यंतच आपण आपल्या मुलांना घेऊन सहपरिवार येथून दुसरीकडे निघून जाऊ. वृंदावन नावाचे एक नवे वन आहे. तेथे पवित्र पर्वत, गवत आणि वनस्पती आहेत. ते आमच्या जनावरांसाठी हितकारक आहे. गोप, गोपी आणि गाईंसाठी ते योग्य स्थान आहे. जर हे म्हणणे तुम्हाला पटत असेल, तर आजच आपण तिकडे जावयास निघू. उशीर करू नका. छकडे जोडा आणि आमची गुरे वासरे पुढे जाऊ देत.

उपनंदाचे म्हणणे सर्व गोप गोपींना पसंत पडले. सर्व गोप एकमताने, छान!  छान! म्हणाले. त्यांनी आपल्या गाईंचे कळप एकत्रित केले आणि छकडय़ांवर सर्व सामग्री ठेवून ते वृंदावनाकडे निघाले. गवळय़ांनी वृद्ध, मुले, स्त्रिया यांना, तसेच सर्व सामान छकडय़ांवर ठेवले आणि स्वतः त्यांच्या पाठोपाठ ते धनुष्यबाण घेऊन अत्यंत सावधपणे चालू लागले. गाई वासरांना त्यांनी पुढे घातले आणि त्यांच्या पाठोपाठ रणशिंगे आणि तुताऱया जोराजोराने वाजवीत पुरोहितांसह ते चालले. वक्षस्थळांवर ताजी केशराची उटी लावून, सुंदर वस्त्रे परिधान करून, गळय़ांमध्ये सोन्याचे दागिने घालून  गाडय़ांवर बसलेल्या गोपी आनंदाने श्रीकृष्णाच्या लीला गात चालल्या होत्या. तसेच यशोदा आणि रोहिणी श्रीकृष्ण आणि बलराम यांच्यासह एका छकडय़ात बसल्या होत्या. त्या आपल्या दोन्ही मुलांचे बोबडे बोल ऐकण्यात गुंग झाल्या होत्या. त्या सर्व लोकांचे लक्ष श्रीकृष्णावर जडलेले असल्यामुळे ते रात्रंदिवस त्याला सांभाळण्याचा विचार करीत असत.

– ऍड. देवदत्त परुळेकर

Related posts: