|Saturday, February 22, 2020
You are here: Home » विशेष वृत्त » आता कचऱ्यापासून द्रवरूप खताची निर्मिती

आता कचऱ्यापासून द्रवरूप खताची निर्मिती 

सावित्रीबाई फुले विद्यापीठाची विद्यार्थिनी चैताली क्षीरसागर व मार्गदर्शकांचे संशोधन

ऑनलाईन टीम / पुणे

औरंगाबाद ते पुण्या-मुंबईपर्यंत कचऱ्याच्या प्रश्नाने उग्र स्वरूप धारण केलेले असताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची विद्यार्थिनी असलेल्या चैताली पोपट क्षीरसागर हिने जैविक कचऱयापासून दर्जेदार अशा द्रवरूप खताची निर्मिती करण्याचे संशोधन केले आहे. राष्ट्रीय पातळीवरील आंतरविद्यापीठिय ‘अन्वेषण’ स्पर्धेत सादर झालेल्या या संशोधनाला राष्ट्रीय पातळीवरील दुसऱया क्रमांकाचे पारितोषकही मिळाले.

चैताली पोपट क्षीरसागर असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. ती अहमदनगर जिह्यातील सोनई येथील आर्ट्स सायन्स कॉमर्स महाविद्यालयात विज्ञान शाखेच्या पहिल्या वर्षात (एफवाय, बीएस्सी) शिक्षण घेत आहे. तिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर लावरे आणि त्यांच्याकडे संशोधन करणारी विद्यार्थिनी ऐश्वर्या मारकड यांनी मार्गदर्शन केले. चैताली ही डॉ. लावरे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या सहा महिन्यांपासून या विषयावर काम करत आहे. याअंतर्गत जैविक कचऱयापासून द्रवरूप खत तयार करण्याचा प्रयोग करण्यात आला. हे खत पिकांसाठी अतिशय उपयुक्त असून, ते द्रवरूप असल्याने वापरण्यासाठीही सोयीचे ठरते. तसेच कचऱयाची समस्यासुद्धा आपोआप निकाली लागते.

 राष्ट्रीय पातळीवरील आंतरविद्यापीठिय संशोधन, नाविन्यपूर्ण व उपयुक्त प्रकल्पांच्या सादरीकरणाची स्पर्धा दरवषी होत असते. ती याच आठवडय़ात हरयाणामधील अंबाला येथील चित्करा विद्यापीठात पार पडली. त्यामध्ये 15 राज्यांमधील विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. त्यात चैताली तसेच चहक खजुरिया व शुभान्यू सिंग हे विद्यार्थी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे सहभागी झाले होते. त्यात चैतालीने कृषी विषयांतर्गत हे सादरीकरण केले. त्यात तिला राष्ट्रीय पातळीवरील दुसऱया क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. ती मूळची अहमदनगर जिह्यातील नेवासे फाटा येथील मुकिंदपूर या गावची आहे. तिचे शालेय शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले आहे. तिचे आई-वडील दोघेही प्राथमिक शिक्षक आहेत. यापूर्वी तिने विज्ञान स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा अशा विविध स्पर्धांमध्ये यश मिळवले आहे, अशी माहिती या स्पर्धेसाठी विद्यापीठाकडून मेन्टॉर म्हणून गेलेले डॉ. शशिकांत गुंजाळ यांनी दिली.

कचरा समस्या सुटण्यास मदत होईल : चैताली क्षीरसागर

या यशाबाबत बोलताना चैताली म्हणाली, लावरे सर आणि ऐश्वर्या मारकड यांनी केलेले मार्गदर्शन आणि या प्रकल्पाचे मी करू शकलेले सादरीकरण यामुळे मला हे यश मिळू शकले. यातून कचऱयाची समस्या सुटण्यास मदत होईल.

पेटंटसाठी प्रयत्नशील : मार्गदर्शक डॉ. शंकर लावरे

चैताली मार्गदर्शन करणारे प्राचार्य डॉ. शंकर लावरे म्हणाले, जैविक कचऱयापासून  खत करण्याचे काम अनेक जण करतात. मात्र, आम्ही संशोधनाद्वारे एक प्रक्रिया व उपकरण विकसित केले आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या जैविक कचऱयाचे (फळे, भाजीपाला, पालापाचोळा, हाडे, उरलेले अन्न) रूपांतर द्रवरूप खतात करणे शक्मय होते. त्यासाठी केवळ आठवडय़ाभराचा काळ लागतो. त्यानंतरही साधारण 30 टक्के पदार्थ मागे उरतात. त्याचे एकाच दिवसात खतात रूपांतर करता येते. या प्रक्रियेत कचऱयाचे तुकडे केले जातात. त्याच्यावर गरम पाण्याची क्रिया केली जाते आणि काही जीवाणूही वापरले जातात. त्यामुळे ही क्रिया वेगाने घडून येते. या प्रक्रियेतील काही घटकांसाठी पेटंट मिळावे, यासाठीही आम्ही प्रयत्नशील आहोत.

Related posts: