|Tuesday, August 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » भाजपला स्वतःच्या घोटाळय़ांवर चर्चा नको, म्हणून संसद ठप्प!

भाजपला स्वतःच्या घोटाळय़ांवर चर्चा नको, म्हणून संसद ठप्प! 

प्रतिनिधी/ पणजी

संसदेतील कामकाज बंद पडण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच जबाबदार असून त्यांचे भाजपचे काँग्रेसवरील आरोप म्हणजे ‘चोराच्या उलटय़ा बोंबा’ असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांनी केली आहे. भाजपच्या गोव्यातील तिन्ही  खासदारांचे पणजीत होणारे उपोषण म्हणजे ‘नाटक’च असून जनतेने ते अवश्य पहावे, अशा शब्दात नाईक यांनी भाजपवर टीका केली आहे.

पणजीतील काँग्रेस भवनात काल बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत नाईक यांनी पुढे सांगितले की, संसदेच्या कामकाजात अडथळा येण्यास किंवा ते बंद पडण्यास काँग्रेस जबाबदार नाही, तर मोदी आणि भाजप नेत्यांनाच ते कामकाज चाललेले नको होते. देशभरात जे घोटाळे झाले त्यांचा जाब संसदेच्या दोन्ही सभागृहांत काँग्रेसतर्फे विचारण्यात आल्यानंतर मोदी आणि त्यांच्या मंत्र्यांकडे उत्तरच नव्हते. त्या घोटाळ्यांनी पुन्हा उचल खालेली भाजपला नको आहे. ही वस्तुस्थिती असल्यामुळे मोदीनीच संसदेचे कामकाज बंद ठेवल्याचा दावा नाईक यांनी केला आहे.

भाजपला घोटाळय़ांवर चर्चा नको

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे पुत्र जय शहा यांची मालमत्ता रु. 50,000 वरून रु. 80 कोटी कशी झाली? हा विषयच भाजपला नकोसा झाला आहे. नीरव मोदी फसवून पळून परदेशात गेला, विजय मल्ल्याला सरकारचे सहकार्य आहे. छत्तीसगडमध्ये करोडोंचा घोटाळा झाला. तेथील मुख्यमंत्री संशयाच्या छायेत आहेत. मध्यप्रदेशात व्यापम घोटाळा झाला. अशी अनेक प्रकरणे संसदेत चर्चेसाठी येऊ नयेत म्हणूनच मोदी यांनी कामकाज बंद ठेवले आहे.

केंद्रात महत्त्वाच्या पदांवर आरएसएसचे लोक असल्यामुळे देशात कधी हिटलरशाही येईल ते सांगता येत नाही, असेही नाईक म्हणाले.

 राज्यपालांना भेटणार : नाईक

गोव्यात मुख्यमंत्री नाही आणि संपूर्ण राज्यभर प्रशासन ठप्प झाले आहे. हे असे किती दिवस चालणार? असा प्रश्न नाईक यांनी केला. राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी याची दखल घेणे आवश्यक आहे. परंतु त्यांनीही दुर्लक्षच केल्याचे दिसते. हा विषय घेऊन राज्यपालांना भेटून निवेदन देणार असल्याचे नाईक यांनी सांगितले.