|Friday, November 15, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » अतिथि धर्म पाळणारे वनवासी

अतिथि धर्म पाळणारे वनवासी 

महामुनि शुकदेव राजा परिक्षितीला समजून सांगताना पुढे म्हणतात-जेव्हा मनुष्याला विचारांती असे समजते की, हे शरीर म्हणजे मी नाही, तेव्हा या शरीरावर सुद्धा आत्म्याइतके प्रेम राहात नाही. म्हणूनच तर देह आसन्नमरण झाल्यावर सुद्धा जगण्याची आशा प्रबळ असतेच. तात्पर्य, देह जाणार, हे निश्चित झाल्यावरही तो राहावा, असे वाटते ते आत्म्यासाठीच. यावरून हे सिद्ध होते की, सर्व प्राणी आपल्या आत्म्यावरच सर्वाधिक प्रेम करतात आणि त्याच्यासाठीच या सर्व चराचर जगावरसुद्धा प्रेम करतात. या श्रीकृष्णांनाच तू सर्व आत्म्यांचा आत्मा समज. जगाच्या कल्याणासाठीच मायेचा आश्रय घेऊन ते येथे देह धारण करण्यासारखे वाटतात. जे लोक श्रीकृष्णांचे खरे स्वरूप जाणतात, त्यांच्या दृष्टीने या जगामध्ये जे चराचर पदार्थ आहेत, ते सर्व श्रीकृष्णस्वरूपच आहेत. त्यांच्याव्यतिरिक्त दुसरी कोणतीच वस्तू नाही. सर्व वस्तू आपल्या कारणातच राहात असतात. त्या कारणाचे सुद्धा परम कारण भगवान श्रीकृष्ण आहेत. तर आता सांग, कोणत्या वस्तूला श्रीकृष्णांपेक्षा वेगळी म्हणावे? व्रजवासियांचे श्रीकृष्णांवर सर्वाधिक प्रेम आहे ते यामुळेच.

यापुढे श्रीमद्भागवतात वृंदावनाचे व भगवंताचे नाते सांगणारे सुंदर वर्णन आले आहे. वृंदावन गुरांच्या चाऱयाने भरलेले व फुलांनी लहडलेले होते. पुढे गाई, त्यांच्या पाठीमागे बासरी वाजवीत श्यामसुंदर, त्यांच्यामागे बलराम आणि त्यापाठोपाठ श्रीकृष्णांच्या यशाचे गायन करणारे गोपाळ असे सर्वजण विहार करण्यासाठी त्या वनात गेले. तेथे कोठे भ्रमर मधुर गुंजारव करीत होते, कोठे हरिणांचे कळप होते, तर कोठे पक्षी किलबिलाट करीत होते. तसेच कोठे कोठे महात्म्यांच्या हृदयाप्रमाणे स्वच्छ पाण्याने भरलेली सरोवरे होती. त्यातील कमळांच्या सुगंधाने सुवासित झालेला वारा तेथे वाहात होता. ती रमणीयता पाहून भगवंतांनी तेथे विहार करण्याचे ठरविले. फुला फळांच्या भारांनी वाकलेले वृक्ष लालसर पालवी फुटलेल्या फांद्यांनी भगवंताच्या चरणांना स्पर्श करीत आहेत, असे पाहून आनंदाने स्मित हास्य करीत बलराम श्रीकृष्णांना म्हणाले-हे देवश्रे÷ा! देव ज्यांची पूजा करतात, त्या चरणकमळांना हे वृक्ष, फुले आणि फळे घेऊन आपल्या शेंडय़ांनी नमस्कार करीत आहेत. असेही असेल की, ज्या पापामुळे त्यांना वृक्षजन्म घ्यावा लागला, ते पाप दूर करण्यासाठीच ते असे करीत असावेत. हे पुण्यशील आदिपुरुषा! तू जरी या वृंदावनामध्ये तुझे मूळ रूप झाकून ठेवून राहात असलास, तरी तुझे श्रे÷ भक्त मुनिगण तूच आपली इष्टदेवता आहे, हे ओळखून बहुतेक भ्रमरांच्या रूपामध्ये तुझ्या त्रिभुवन पावन यशाचे गायन करीत तुझे भजन करतात. ते आपल्याला कधीही सोडू इच्छित नाहीत. हे स्तुत्य बंधो! तू आपल्या घरी आल्याचे पाहून हे मोर आनंदाने नाचत आहेत. गोपिकांप्रमाणे या हरिणी तुझ्याकडे प्रेमळ नजरेने पाहून तुला प्रसन्न करीत आहेत. या कोकिळा मधुर कुहूरवाने आपले स्वागत करीत आहेत. घरी आलेल्या अतिथीचे स्वागत करणे हा सत्पुरुषांचा स्वभावच असतो. अतिथि धर्म पाळणारे हे वनवासी धन्य होत.

Related posts: