|Monday, August 26, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » गुन्हेगारी, राजकारण आणि धर्म

गुन्हेगारी, राजकारण आणि धर्म 

अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याबद्दल आसारामबापू या धर्मगुरूला झालेली आजन्म कारावासाची शिक्षा, उत्तर प्रदेशातील मदरशात मौलवीकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची तक्रार, तसेच काँगेसचे हात मुस्लीम व शिखांच्या रक्ताने माखले आहेत, अशी ज्येष्ठ नेते सलमान खुर्शिद यांनी दिलेली कबुली अशा तीन घटना गेल्या दोन दिवसात घडल्या आहेत. अर्थाअर्थी या तिन्ही घटनांचा परस्पर संबंध काहीही नाही. मात्र, गुन्हा आणि हिंसाचार हे या तिन्ही घटनांमधील समान मुद्दे आहेत. पहिल्या आणि दुसऱया घटनेत धर्मगुरूंचा संबंध आहे. पहिल्या घटनेत गुन्हा सिद्ध होऊन गुरू मरेपर्यंत गजाआड गेला आहे. दुसऱया घटनेत अन्य एका धर्मगुरू विरोधात अशाच क्रूर आणि मानवतेला काळिमा फासणाऱया गुन्हय़ाबद्दल कारवाई सुरू आहे. तिसरी घटना भिन्न आणि काहीशा जुन्या काळातील आहे. तथापि, तीही धार्मिक हिंसाचाराशी म्हणजेच धर्माशी संबंधित आहे. एका राजकीय पक्षाच्या नेत्याने धार्मिक मुद्दय़ावरून झालेल्या हिंसाचाराशी आपल्या पक्षाचा संबंध होता, अशी कबुली दिल्याने ती पुन्हा एकदा महत्त्वाची ठरली आहे. ही परिस्थिती एकाच पक्षाची आहे असे नाही. बव्हंशी राजकीय पक्ष कमी अधिक प्रमाणात याच वळणावरचे आहेत. एकंदर या तिन्ही घटनांवरून गुन्हेगारी, राजकारण आणि धर्म यांचा परस्पर संबंध स्पष्ट होतो. त्यामुळे त्यांचा एकत्रित विचार करणे अप्रस्तुत होणार नाही. वास्तविक धर्म आणि राजकारण या मानवाला उपयुक्त अशा बाबी आहेत. या दोन बाबींमुळे मानव इतर सजीवांपासून वेगळा ठरतो आणि महत्त्वाचाही ठरतो. आहार, निद्रा, भय आणि मैथुन (पुनरूत्पादन या अर्थाने) या चार बाबी हा मानवासह सर्वच सजीवांचा स्थायीभाव असतो. त्यादृष्टीने माणूस हा देखील एक प्राणी आहे. तथापि, त्याला बुद्धीचे अनन्यसाधारण वरदान मिळाले आहे. या बुद्धीमुळे त्याची प्रत्येक उक्ती आणि कृती अन्य सजीवांपेक्षा अधिक प्रभावी आणि वेगळी असते. धर्म आणि राजकारण हे मानवाच्या बुद्धीचे दोन झगमगते पैलू आहेत. माणसाचे विश्व इतर सजीवांपेक्षा भिन्न असण्यात या दोन पैलूंचा दूरगामी आणि महत्त्वाचा सहभाग आहे. इतर सजीवांना धर्म नसतो तसेच स्वतःच्या जगण्यासाठी जितके आवश्यक असते त्यापलीकडे राजकारण करण्याचीही त्यांना आवश्यकता नसते. मानवाने मात्र स्वतःच्या बुद्धी आणि विचारशक्तीच्या आधारावर या दोन पैलूंचा विकास केला. तसेच हे दोन पैलू मानवाच्या वैचारिक उत्क्रांतीच्या विविध टप्प्यांमध्ये त्याला साहाय्यभूत ठरले आहेत. तथापि, आज असे दिसते की या दोन्ही पैलूंना पराकोटीचा स्वार्थ, तीव्र भोगलालसा आणि बेफाम हिंसाचार यांनी ग्रासले आहे. त्यामुळे धर्म आणि राजकारण ही दोन्ही क्षेत्रे बदनाम झाली आहेत. या क्षेत्रांमध्ये सर्वसामान्यांचे नेतृत्व करणाऱया, ज्येष्ठ, प्रतिष्ठित आणि मान्यताप्राप्त व्यक्तींकडून जेव्हा गुन्हेगारी प्रवृत्तीचे प्रछन्न दर्शन घडते तेव्हा, सर्वसामान्यांच्या विश्वासाला फार मोठा तडा गेल्याशिवाय रहात नाही. ज्या धर्मगुरूंच्या माध्यमातून आपल्या जीवनाला समाधान, नैतिकता आािण सुरक्षितता यांचे आधिष्ठान मिळेल अशी अपेक्षा केली जाते, तेच आपले सर्व प्रकारचे शोषण आणि भक्षण करतात ही वस्तुस्थिती कित्येकदा सर्वसामान्यांच्या आकलनापलीकडची ठरते. किंवा ज्या राजकीय नेत्यांकडून किंवा पक्षांकडून आपण विकास, आर्थिक उन्नती आणि भौतिक प्रगतीच्या धोरणांची अपेक्षा करतो ते, सत्ता मिळविणे किंवा सत्ता राखणे यासाठी धार्मिक हिंसाचाराचा आधार घेतात तेव्हा सर्वसामान्य माणूस कोलमडल्याशिवाय रहात नाही. गेल्या दोन दिवसात समोर आलेल्या या तीन घटनांनी हे जळजळीत वास्तव आपल्यासमोर उघडे केले आहे. धर्म आणि राजकारण या दोन्ही क्षेत्रांची उदात्तता अशा घटनांमुळे केवळ झाकोळत नाही, तर पूर्णतः डागाळून जात आहे. धर्म काय, किंवा राजकारण काय, या दोन्ही बाबींची उदात्तता त्यात कार्यरत असणाऱया किंवा त्यात नेतृत्व करण्याचा दावा करणाऱयांच्या कृतीवर अवलंबून असते. केवळ त्यासंबंधीच्या ग्रंथांमध्ये किंवा पुस्तकांमध्ये काय लिहिले आहे, भाषण आणि प्रवचनांमधून कशी नैतिकता सांगितली जात आहे, यावर फारसे काही अवलंबून नाही. सर्वसामान्यांना परिणाम भोगावे लागतात ते कृतींचे. गेल्या दोन तीन दशकांमध्ये या क्षेत्रांची नैतिक घसरण प्रचंड प्रमाणात झाली आहे. त्यापूर्वीही गुन्हेगारी प्रवृत्तींची माणसे त्यात नव्हती असे नाही. पण संख्या कमी होती आणि या क्षेत्रांचे नियंत्रण तरी निदान सभ्य हातांमध्ये होते. आता तेही गुन्हेगारी प्रवृत्तींच्या हाती जाताना दिसते. हे भयावह असून त्याला वेळीच आवर घालण्याची आवश्यकता आहे. आपल्या साऱयांच्या जीवनातील या क्षेत्रांचे महत्त्व आणि अपरिहार्यता पाहता ती शुद्ध राहिली पाहिजेत अशी साऱयांची अपेक्षा आहे. तथापि, हे उत्तरदायित्व कोणाचे, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. हें उत्तरदायित्व या क्षेत्रांचे नेते, कार्यकर्ते, सरकार आणि सर्वसामान्य जनता या सर्वांचेच आहे. ज्या जनतेच्या जीवावर आपल्या उडय़ा आहेत, तिच्याशी किमान प्रामाणिकपणा राखणे आणि विश्वास सार्थ ठरविणे ही या क्षेत्रातील धुरिणांची जबाबदारी आहे. तर कायदा व्यवस्था कठोर आणि तत्पर राखून प्रत्येक गुन्हेगार व्यक्तीला जरब बसेल अशी शिक्षा करणे हे काम सरकारचे आहे. या दोन्ही क्षेत्रांमधील भोंदू आणि लबाड व्यक्तींच्या नादी न लागणे आणि आपले व्यवहार सजगपणे करणे हे समाजाचेही कर्तव्य आहे. जेथे सहजगत्या फसणारी माणसे असतात, तेथे फसविणारेही अमाप तयार होतात. केवळ धर्म आणि राजकारणातच नव्हे, तर अर्थकारणातही मोठय़ा प्रमाणात असे भोंदू बाबा आहेत, हे आपण पाहतोच. तेव्हा, वरीलपैकी प्रत्येकाने आपले उत्तरदायित्व डोळसपणे पार पाडल्यासच या अपप्रवृत्ती नियंत्रणात येतील. तसे न झाल्यास समाजात अराजक माजण्यास वेळ लागणार नाही. धर्म, राजकारण आणि अर्थकारणाच्या सबळपणावरच कोणत्याही समाजाचे किंवा देशाचे भवितव्य अवलंबून असते. तो सबळपणा नैतिकतेवर अवलंबून असतो. ती संपल्यास आपली वाटचाल ‘कोलमडलेल्या देशा’कडे होईल यात शंका नाही.