|Sunday, February 23, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » तटकरें कुटुंबिय ठोकणार ‘आमदार’कीचा चौकार?

तटकरें कुटुंबिय ठोकणार ‘आमदार’कीचा चौकार? 

अनिल तटकरे विधानपरिषदेसाठी रिंगणात

वडील, काका, चुलत बंधू विद्यमान आमदार

उमेदवारी अर्जावेळी मात्र गृहकलह उघड

प्रतिनिधी /चिपळूण

विधान परिषदेच्या कोकण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांचे सुपूत्र अनिकेत तटकरे यांना रिंगणात उतरवले आहे. राजकीय बेरजेचे गणित पाहता तटकरे कुटुंबीय ‘आमदार’कीचा चौकार ठोकण्याच्या तयारीत आहे. अनिकेत तटकरे यांचे वडील सुनील तटकरे, काका अनिल तटकरे, चुलत बंधू अवधूत तटकरे हे तिघे सध्या आमदार असून त्यांच्या पंगतीत बसण्यात अनिकेत तटकरे यशस्वी ठरतात का हे निकालानंतरच स्पष्ट होईल. दरम्यान अनिकेत यांच्या उमेदवारीवरून तटकरे कुटुंबातील गृहकलह उघड झाला असून अर्ज भरतेवेळी अनिल व अवधूत तटकरे यांची अनुपस्थिती बरेच काही सांगून जाते.

विद्यमान उमेदवार अनिकेत यांचे काका अनिल तटकरे सध्या या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत असून त्यांची मुदत जूनमध्ये संपत आहे. सलग दोनवेळा प्रतिनिधीत्व करणाऱया अनिल तटकरे यांचा पत्ता कापून राष्ट्रवादीने त्यांच्या पुतण्याला संधी दिल्याने ते प्रचंड नाराज आहेत. अनिक तटकरे यांचा पत्ता कट हेण्यामाध्ये कुटुंबातील अंतर्गत वादाचे कारण असल्याचे पुढे येत आहे. रायगडमध्ये राष्ट्रवादीचा आणि आपला पाया भक्कम करण्याचा सुनील तटकरे यांचा प्रयत्नात घरातूनच विघ्न येऊ लागल्याने त्याची दखल नेतृत्वालाही घेणे भाग पडले आहे.

रोहा नगरपालिका निवडणुकीदरम्यान तटकरेंमधील भाऊबंदकी उघड झाली. त्या निवडणुकीत आमदार अनिल तटकरे यांनी बंधू सुनील तटकरे यांनाच आव्हान देण्याचा प्रयत्न केला. या वादात तटकरे यांनी बाजी मारली. आपल्या 30 वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत तटकरे यांनी पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, विधान परिषद अशा विविध पातळ्यांवर काम केले आहे. जिल्हा परिषदेचे सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून त्यावेळी ते ओळखले गेले. भाऊ व पुतण्याकडूनच मार्गात अडथळे येऊ लागल्याने त्यांनी पुत्र अनिकेत आणि कन्या आदिती यांचे नेतृत्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत शेकापला जास्त जागा मिळूनही जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद कन्या आदिती यांच्यासाठी तटकरे यांनी पदरात पाडून घेतले. हा त्याचाच एक भाग होता.

तटकरे कुटुंबात जिल्हा परिषद अध्यक्षांसह तीन आमदार

कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातील आमदार भास्कर जाधव हे गुहागरमधून निवडून आल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर रत्नागिरी जिल्हय़ाचा हक्क असताना तटकरे यांनी तेथे आपले बंधू अनिल तटकरे यांना संधी देऊन सलग दोनवेळा निवडून आणले. त्यानंतर त्यांनी आपल्या श्रीवर्धन मतदार संघातून पुतणे अवधूत याला उमेदवारी देत निवडून आणले. मात्र तरीही बंधू व पुतण्यांची साथ मिळवण्यात तटकरे अपयशी ठरले. सध्या तटकरे कुटुंबियात तीन आमदार, जिल्हा परिषद अध्यक्षपद असताना आता अनिकेतलाही आमदारकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. अनिकेत विजयी झाल्यास तटकरे कुटुंबिय आमदारकीचा चौकार ठोकणार आहे.

रायगडमध्ये नाराजी

दरम्यान, गुरूवारी अनिकेतचा उमेदवारी अर्ज दाखल करताना कोकणातील झाडून सारी नेतेमंडळी उपस्थित होती. मात्र त्यामध्ये काका अनिल तटकरे व बंधून अवधूत तटकरे अनुपस्थित राहिले. राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत तटकरे यांच्या कुटुंबियातील वाद संपला असे जाहीर करण्यात आले. मात्र या दोघांची अनुपस्थिती वेगळेच सांगत आहे. अनिल तटकरे यांच्यासह खोपोलीचे माजी नगराध्यक्ष व पक्षाचे ज्येष्ठ नेते दत्ता मसूरकर हेही यावेळी इच्छुक होते. त्यांनी या मतदार संघातील नेतेमंडळीच्या गाठीभेटीही घेतल्या होत्या. मात्र त्यानाही संधी मिळालेली नाही. दरम्यान, तटकरे कुटुंबात अनेक पदे असताना अनिकेतची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रायगडमध्ये नाराजीच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. तटकरेच्या पुढील कारकीर्दीसाठी त्या घातक ठरू शकतात.

भास्कर जाधवही अनुपस्थित

दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करताना आमदार भास्कर जाधव यांच्यासह त्यांचे सुपूत्र जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते विक्रांत जाधव यांची अनुपस्थिती सर्वांचे लक्ष वेधत होती. गेल्या अनेक वर्षापासून तटकरे आणि जाधव यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. त्यामुळे या निवडणुकीत जाधव यांच्या भूमिकेकडेही सर्वाचे लक्ष लागले आहे.

Related posts: